ठाणे पोलिसांनी वर्षभरात जप्त केले पाच कोटी ४३ लाख ५० हजारांचे अमली पदार्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 12:13 AM2021-01-13T00:13:12+5:302021-01-13T00:14:56+5:30
जितेंद्र कालेकर लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : संपूर्ण ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील पोलिसांनी गेल्या वर्षभरात पाच कोटी ४३ लाख ...
जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: संपूर्ण ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील पोलिसांनी गेल्या वर्षभरात पाच कोटी ४३ लाख ५० हजारांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. यामध्ये एकटया अमली पदार्थ विरोधी पथकाने पाच कोटी तीन लाख ६३ हजार ७७९ रुपयांचा अमली पदार्थ जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबई प्रमाणे ठाण्यातील पानटपरी चालकही यापुढे या पथकाच्या रडारवर राहणार असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
जानेवारी ते डिसेंबर २०२० या संपूर्ण वर्षभरामध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकासह विविध पथकांनी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि अपर पोलीस आयुक्त संजय येनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या विशेष मोहिमेमध्ये तब्बल १०८ गुन्हे दाखल झाले. यात १६० आरोपींना अटक केली. गांजाच्या तस्करीमध्ये ३२ गुन्हे दाखल असून ५० जणांना अटक केली. एक कोटी ७२ लाख ६९ हजारांचा ८८८ किलो ८४१ ग्रॅम गांजा या आरोपींकडून जप्त केला आहे. दोन गुन्हयांमध्ये पाच आरोपींकडून तीन कोटी २७ लाख १५ हजार १३० रुपयांचा ६५ किलो ८०८ ग्रॅम चरस जप्त झाला. वर्षभरात १४ आरोपींकडून २२ लाख १६ हजार ६०० रुपयांची दोन किलो १९९ ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) पावडर हस्तगत केली. सध्या काही तरुणाईमध्ये चर्चेत असलेले आठ लाखांचे एलएसडी पेपर तसेच पाच लाख २३ हजारांचे अफीम जप्त केले आहे. याशिवाय, अमली पदार्थ विरोधी पथकाने एक कोटी ३५ लाख ५० हजारांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ तसेच सिगारेट जप्त केली. यामध्ये १८ जणांना अटक केली आहे. या पथकाने गेल्या वर्षभरात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली २४ गुन्हयांमध्ये ४८ आरोपींना अटक केली.
* मुंबईत ज्याप्रमाणे नार्कोटीक्स ब्यूरोने अमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी एका पानटपरी चालकाला समन्स बजावले आहेत. त्याप्रमाणे ठाण्यातही पानटपरी चालकांवर करडी नजर ठेवली जाणार आहे. यामध्ये कोणाकडून अमली पदार्थांची तस्करी केली जाते का?याचीही चाचपणी केली जाणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने ‘लोकमत’ला दिली.