ठाण्यातील पोलिस हवालदार सचिन खटे यांचा अपघातात मृत्यू
By जितेंद्र कालेकर | Updated: March 24, 2025 20:26 IST2025-03-24T20:26:18+5:302025-03-24T20:26:36+5:30
वागळे इस्टेट पाेलिस ठाण्याचे हवालदार खटे त्यांचे सहकारी सचिन चव्हाण हे बीट मार्शल क्रमांक तीन येथे रात्रपाळी करीत हाेते.

ठाण्यातील पोलिस हवालदार सचिन खटे यांचा अपघातात मृत्यू
ठाणे : ठाण्याच्या वागळे इस्टेट पाेलिस ठाण्यातील हवालदार सचिन खटे (४५) दुचाकीवरून गस्त घालत असताना दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात त्यांच्या डाेक्याला मार लागून ते गंभीर जखमी झाले हाेते. उपचारादरम्यान त्यांचा साेमवारी (दि. २४) सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि आठ वर्षांचा मुलगा आहे. कर्तव्यकठोर पाेलिस कर्मचाऱ्याला गमावल्याची भावना वरिष्ठ पाेलिस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी व्यक्त केली.
वागळे इस्टेट पाेलिस ठाण्याचे हवालदार खटे त्यांचे सहकारी सचिन चव्हाण हे बीट मार्शल क्रमांक तीन येथे रात्रपाळी करीत हाेते. रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास वागळे इस्टेट, संकल्प चाैक येथे त्यांची माेटारसायकल स्लीप झाली. माेटारसायकल दुभाजकाला धडकल्याने खटे यांच्या डाेक्याला मार लागून ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या मागे बसलेले पाेलिस अंमलदार चव्हाण यांना किरकाेळ मार लागला. अपघातानंतर खटे यांना तातडीने मुलुंड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्या डाेक्याला गंभीर मार लाहून ते ब्रेनडेड झाले. साेमवारी (दि. २४) त्यांचा मृत्यू झाला. खटे यांच्यावर सातारा जिल्ह्यातील कराड येथे अंत्यविधी केले जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पाेलिस निरीक्षक गवारे यांनी दिली.