ताबा मिळण्यासाठी करणार न्यायालयाकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 04:06 AM2020-02-28T04:06:49+5:302020-02-28T04:07:01+5:30
रवी पुजारी २५ गुन्ह्यांत वॉण्टेड; ठाणे पोलीस बंगळूरला रवाना
- जितेंद्र कालेकर
ठाणे : बंगलोर पोलिसांनी नुकताच अटक केलेला अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी याच्यावर ठाणे पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये २५ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यात सर्वाधिक २२ गुन्हे खंडणी, खंडणीसाठी धमकी, एक खून, तर एक खुनाचा प्रयत्न आणि पाच मोक्का असे गुन्हे त्याच्या नावावर आहेत. त्याला ताब्यात घेण्यासाठी ठाणे गुन्हे शाखेचे एक पथक बुधवारी बंगळूरला गेले असून त्याचा ताबा मिळविण्यासाठी तेथील न्यायालयामार्फत प्रयत्न करणार असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले.
ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ तसेच मुंबई, नवी मुंबई आदी परिसरांत १९९० ते २०१९ या २९ वर्षांच्या काळात बांधकाम व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक, राजकीय नेते आदींना धमकावून त्यांच्याकडून खंडणी उकळणाºया रवीविरुद्ध २५ पेक्षा अनेक गुन्हे दाखल आहेत.
काही काळ छोटा राजन टोळीची सूत्रे सांभाळणाºया रवीने १५ वर्षांपूर्वी स्वत:ची टोळी तयारी केली. तिच्यामार्फत तो बड्या असामींकडून खंडणी वसूल करीत होता. अनेक ठिकाणी त्याच्या टोळीने खंडणीसाठी खून, खुनाचा प्रयत्न असे प्रकार केले. डोंबिवलीत २००२ मध्ये केबल व्यावसायात भागीदारी करण्यासाठी आनंद पालन या केबल व्यावसायिकाचा खून केला होता. तर, उल्हासनगरमध्येही खंडणीसाठी त्याने एका व्यावसायिकाच्या खुनाचा प्रयत्न केला आहे. वाढत्या संघटित गुन्हेगारी कारवायांमुळे रवीसह त्याच्या टोळीविरुद्ध कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी २०१० मध्ये आर्म अॅक्ट आणि खंडणीच्या गुन्ह्यात मकोकांतर्गत त्याच्यावर कारवाई केली. पुन्हा २०१५ मध्ये उल्हासनगरमधील खून प्रकरणातही मकोका दाखल आहे. तर, मध्यवर्ती पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये त्याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मकोका दाखल आहे. २०१७ मध्ये कासारवडवली आणि कळवा पोलीस ठाण्यात आणि २०१८ मध्ये अपहरण, खंडणीच्या गुन्ह्यातही मकोका दाखल आहे. त्याच्याविरुद्ध ठाणे शहरात चार, कल्याण परिमंडळातील पोलीस ठाण्यांमध्ये ११, उल्हासनगरमध्ये सहा तर वागळे इस्टेट परिमंडळात तीन असे २५ गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. यातील बहुतांश म्हणजे १८ गुन्ह्यांचा तपास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाकडे आहे. सर्वच गुन्ह्यांमध्ये तो वॉण्टेड असल्यामुळे सर्व गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत.
लवकरच ठाणे पोलिसांकडे ताबा
पुजारीचा ताबा मिळण्यासाठी एक पथक २६ फेब्रुवारी २०२० रोजी बंगलोरला रवाना झाले आहे. ते त्याचा ताबा मिळण्यासाठी न्यायालयात मागणी करणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने दिली. तूर्त त्याचा ताबा मिळणार नसला, तरी येत्या काही दिवसांमध्ये तो ठाणे पोलिसांना दिला जाईल, असेही या अधिकाºयाने सांगितले.