ठाणे पोलिसांनी नष्ट केले दहा कोटींचे अमली पदार्थ; ५० लाखांच्या अफिमचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 09:45 PM2022-02-24T21:45:47+5:302022-02-24T21:46:49+5:30
ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
ठाणे : अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांकडून विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या दीड कोटींच्या ३० किलो ७७३ ग्रॅम चरससह तब्बल दहा कोटींचे अमली पदार्थ ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी नष्ट केले. राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या आदेशाने तसेच न्यायालयाच्या मान्यतेने तळोजा एमआयडीसी येथे मुंबई वेस्ट मॅनेजमेंटच्या मदतीने ठाणे पोलिसांनी ही कार्यवाही केली.
अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पोवार यांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाच परिमंडळातील विविध पोलीस ठाण्यांच्या पथकांनी तसेच अमली पदार्थ विरोधी पथकाने गेल्या १५ वर्षांमध्ये अमली पदार्थ विरोधी कारवाया करून या पदार्थाची साठवणूक, विक्री आणि ते बाळगल्याप्रकरणी विविध गुन्हे दाखल केले होते. यात गांजा, चरस आणि ब्राऊनशुगरसह विविध प्रकारचा अमली पदार्थ जप्त केलेला होता. यातील १९ पोलीस ठाण्यांमधील ९१ गुन्ह्यांमधील ९७४ किलो ८२४ ग्रॅम १०९ मिलीग्रॅम इतक्या वजनाचा अमली पदार्थ २३ फेब्रुवारी २०२२ रोजी नवी मुंबईतील तळोजा येथे नष्ट केला आहे. यात सुमारे दीड कोटींचे चरस आणि ५० लाखांच्या अफिमचाही समावेश होता.
अशी झाली कारवाई-
अमली पदार्थ- दाखल गुन्हे - मुद्देमालाचे वजन
गांजा- ५४- ९३८ किलो १६१ ग्रॅम ७३ मिली ग्रॅम
चरस- २४- ३० किलो ७७३ ग्रॅम ५ मिलीग्रॅम
गर्द- ०९ - ३ किलो १४१ ग्रॅम २४ मिलीग्रॅम
ब्राऊनशुगर - १- १३८ ग्रॅम
हेरॉईन - १- ४०६ ग्रॅम
मेन्ड्रॉक्स पावडर- १- ४७३ ग्रॅम ७ मिलीग्रॅम
अफीम - १- १ किलो ७३२ ग्रॅम
अमली पदार्थ विरोधी पथकाने १६ मे २०१५ रोजीच्या केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार जप्त केलेला अमली पदार्थ नष्ट करण्याची अधिसूचना प्रसिद्ध केली होती. त्यानंतर राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यालयाचे उपायुक्त दत्तात्रेय कांबळे यांची मुद्देमाल नाश समिती स्थापन केली होती. समितीच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त दिनकर मोहिते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पोवार, गिरीश बने आणि सहायक पोलीस निरीक्षक रणजीत नलावडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.