चरस तस्करांबाबत ठाणे पोलिसांनी केली जम्मू काश्मीर पोलिसांकडे चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 10:12 PM2018-03-04T22:12:09+5:302018-03-04T22:12:09+5:30
ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने मुंब्य्रातून तीन चरस तस्कारांना जेरबंद केल्यानंतर त्यांची माहिती मिळविण्यासाठी ठाणे पोलिसांनी आता जम्मू काश्मीर पोलिसांशी पत्रव्यवहार केला आहे.
ठाणे: थेट जम्मू काश्मीरमधून मुंबई ठाण्यात चरसची तस्करी करणा-या साजीद खानसह तिघांना मुंब्य्रातून अटक केल्यानंतर त्यांच्यावर आणखी कोणते गुन्हे दाखल आहेत का? त्यांचे दहशतवाद्यांशी काही संबंध आहेत का? यादृष्टीनेही आता ठाणे पोलिसांनी जम्मू काश्मीर पोलिसांकडे माहिती मागविली आहे.
साजीद, अब्दुल गुजली आणि मोहम्मद मकबूल भट या तिघांना मुंब्य्रातून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, राजकुमार कोथमिरे यांच्या पथकाने १ मार्च रोजी अटक केली. त्यांच्याकडून ३१ लाख ४० हजारांचे १५ किलो ७०० ग्रॅम चरस तसेच एक लाख ७३० रुपयांची रोकड असा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. त्यांच्याकडे इतक्या मोठया प्रमाणात चरस सारखा अंमली पदार्थ मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आणखी साथीदारांची नावे, ते कोणत्या टोळीशी संबंधित आहेत? त्यांचा आणि दहशतवाद्यांशीही कितपत संबंध आहे? त्यांना आर्थिक रसद पुरविणारे किंवा त्यांचा म्होरक्या कोण आहे? याची चौकशी या तिघांकडे सध्या करण्यात येत आहे. शिवाय, जम्मू काश्मीर पोलिसांचीही त्याबाबत मदत घेण्यात आहेत. ठाणे पोलीस आयुक्तांमार्फत याबाबतचे पत्र जम्मू काश्मीर पोलिसांना पाठविण्यात आले आहे. या पत्रातून ठाणे पोलिसांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात १ मार्च रोजी दाखल झालेल्या गुन्हयाचा तपशील दिला आहे. त्यामुळे जम्मू काश्मीर पोलिसांकडून त्यावर अधिक तपशीलवार माहिती मिळाल्यास अटक केलेल्या या तिघांकडून आणखी माहिती मिळण्यास मदत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तुलनेने जम्मू काश्मीरमधून आणलेला हा चरस उच्च प्रतीचा मानला जातो. त्यामुळे त्याची आंतरराष्टÑीय बाजारपेठेत किंमतही किलोमागे दोन कोटींच्या घरात आहे. त्यमुळे मुंब्य्रातही त्यांचे नेमके कोण कोण गिºहाईक आहेत? त्यांची ही तस्करी कोणत्या ठिकाणी कोणत्या वेळेत सुरु असते? याचाही तपास सुरु असल्याची माहिती प्रदीप शर्मा यांनी दिली.