संशयीत आरटीआय कार्यकर्त्यांच्या कारवाईसाठी महापालिकेने दिले ठाणे पोलिसांना पत्र, सखोल चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 07:33 PM2018-03-08T19:33:06+5:302018-03-08T19:33:06+5:30
वारंवार माहिती अधिकारात माहिती मागविणाºया काही कार्यकर्त्यांच्या विरोधात अखेर ठाणे महापालिकेने पोलिसांना एक निवेदन सादर केले आहे. या निवेदनाद्वारे संबधींतावर चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी पालिकेने केली आहे.
ठाणे - आरटीआय कार्यकर्त्यांच्या बाबतीत केलेल्या अभ्यासात काही महत्वाच्या बाबी निर्दशनास आल्या आहेत. काही कार्यकर्ते माहिती मागवितात आणि त्याच माहितीच्या आधारे न्यायालयात याचिका करणारा दुसराच असतो, काही वेळेस केस मागे घेतली जाते, काही जण एकाच विभागात एकाच विषयासाठी वारंवार अर्ज करीत असल्याचेही निदर्शनास आले होते. त्यानंतर आता या माहिती अधिकार कार्यकर्त्यांची भुमिका ही संशयीत आणि ब्लॅकमेलींग स्वरुपाची वाटत असल्याचा निष्कर्ष पालिकेने काढला आहे. त्यानुसार या प्रकरणात सखोल चौकशी करुनस संबधींतावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची महापालिकेने ठाणे पोलिस आयुक्तांकडे केली आहे.
विधानसभेत झालेल्या आरटीआय कार्यकर्त्यांच्या लक्षवेधीच्या अनुषंगाने मागील वर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या ठाणे महापालिकेच्या महासभेत देखील हा मुद्दा चर्चेचा विषय झाला होता. आरटीआय कार्यकर्त्यांना पालिकेत काही अधिकारी अशा कार्यकर्त्यांचे जास्त मनोरंजन करतात, त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई कशा पध्दतीने होऊ शकते याचा विचार करण्याची गरज असल्याचे मत काही नगरसेवकांनी व्यक्त केले होते. तर या माहिती अधिकार कार्यकर्त्यांना कितपत माहिती द्यावी, कोणती माहिती देऊ नये, एक कार्यकर्ता कितीवेळा माहिती मागतो, याचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे मतही काही नगरसेवकांनी व्यक्त केले होते.
विधानसभेत झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महासभेत देखील यातील काही बाबी सभागृहाच्या निदर्शनास आणल्या. प्रशासनाच्या वतीने मागील महिनाभर अशा आरटीआय कार्यकर्त्यांचा अभ्यास सुरु होता. त्यातून काही महत्वाच्या बाबी निदर्शनास आल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. एखादा व्यक्ती वारंवार एका विभागात एकाच विषयासाठी प्रश्न विचारतात, माहिती घेणारे आणि न्यायालयात जाणारे हे दुसरेच असतात, काही व्यक्तीतर एकाच विभागात सुमारे ६० हून अधिक अर्ज टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे, न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर, कालांतराने ती मागेही घेतली जाते. त्यामुळे अशांच्या बाबतीत शंका उपस्थित राहत आहेत. आरटीआय अंतर्गत अर्ज करण्याबाबत माझा विरोध नसल्याचेही आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. परंतु, अशा पध्दतीने एकाच विभागात अर्ज करुन त्रास देणे चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे यावर पोलिसांशी सल्लामसलत करुन, कायदेशीर बाबींचा तपास करुन नियमानुसार कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले होते.
दरम्यान त्या नंतर आता अशा वारंवार तक्रारी दाखल करणाºयांमध्ये सुधीर बर्गे, राजकुमार यादव, संजय घाडीगावकर, आनंद पारगांवकर, राजेश मारे, ईराकी आरीफ, रामभाऊ तायडे, प्रदीप पाटील, शौकत मुलानी, मुकेश कनकिया आदींचा समावेश असल्याचे पालिकेने पोलिस आयुक्तांना दिलेल्या पत्रात या नावांचा उल्लेख केला आहे. या व्यक्तींचा हेतू स्पष्टपणे संशयीत व ब्लॅकमेलींगच्या स्वरुपात असल्याचा निष्कर्ष देखील पालिकेने काढला आहे. या व्यक्तींचे या अनियमित कृतीबाबत सविस्तर माहिती संबधींत विभागाकडून तयार करण्यात आली असून, त्या अनुषंगाने सविस्तर माहिती व्यक्ती व कामनिहाय माहिती तयार करण्यात आली असून ती या पत्राबरोबर पालिकेने पोलीसांना दिली आहे. विशेष म्हणजे या सर्व प्रकरणात यापैकी काही व्यक्तींची एक साखळी कार्यरत असल्याचा निर्ष्कष देखील पालिकेने काढला आहे. त्या अनुषंगाने या सर्वांची सखोल चौकशी करुन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी या पत्राद्वारे पालिकेने पोलिसांना केली आहे.