ठाण्यातील मेडिकल चालकाच्या खुन्याला अखेर ठाणे पोलिसांनी केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 09:52 PM2020-01-21T21:52:39+5:302020-01-21T21:57:39+5:30
ठाण्यातील कळवा येथील मेडिकलमध्ये चोरीसाठी शिरल्यानतर दुकानातील कामगारावर गोळी झाडून त्याचा खून करुन पसार झालेल्या सर्फराज अन्सारी ( रा. नाशिक) याला अखेर २४ दिवसांनी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने २० जानेवारी रोजी अटक केली आहे. त्याला नाशिक पोलिसांनी आर्म अॅक्टच्या गुन्हयात याआधी अटक केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कळव्याच्या शिवाजीनगर येथील मेडिकलमध्ये चोरीसाठी शिरकाव करून प्रेमसिंग राजपुरोहित (२६) या मेडिकल चालकावर गोळीबार करून त्याचा खून करणाऱ्या सर्फराज अन्सारी (२६, रा. नाशिक) याला ठाणे पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्याला २८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
अन्सारी हा सराईत चोरटा असून त्याच्याविरुद्ध नाशिक, मालेगाव, चांदवड, आडगाव आदी पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. त्याने २८ डिसेंबर रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने कळव्यातील वीर युवराज या मेडिकल दुकानातील प्रेमसिंग याच्यावर गोळीबार करून त्याचा खून केला होता. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकसह ठाण्यातील गुन्हे अन्वेषण विभागाची सर्वच पथके या तपासासाठी कार्यरत होती. सीसीटीव्हीतील आरोपीचा फोटो महाराष्टÑभर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने पाठविला होता. याच फोटोची पडताळणी आडगाव येथील दोन संशयित महिलांकडे अचानक समोर दिसलेल्या नाशिक गुन्हे मध्यवर्ती शोध पथकाने केली. त्याच चौकशीतून गावठी पिस्टल, तीन काडतुसे आणि चोरीतील एका मोटारसायकलसह त्याला १६ जानेवारी २०१९ रोजी अटक केली. त्याच्याविरुद्ध आर्म अॅक्टनुसार आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला नाशिक न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिल्यामुळे त्याची रवानगी नाशिक जिल्हा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. ठाणे पोलिसांनी नाशिक न्यायालयाच्या मार्फतीने सर्फराज याला ठाण्याच्या खून प्रकरणात त्याचा ताबा मागितला. ही मागणी मान्य झाल्यानंतर त्याला २० जानेवारी रोजी नाशिक जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक दतात्रय सरक, पोलीस हवालदार सुभाष मोरे, पोलीस नाईक आशिष ठाकूर आणि भगवान हिवरे आदींच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याने आणखी किती ठिकाणी चोºया केल्या आहेत, याचीही कसून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.