लग्न समारंभातून चोरीस गेलेले ४२ तोळे सोन्याचे दागिने ठाणे पोलिसांनी मध्यप्रदेशातून केले हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 06:08 PM2020-12-24T18:08:36+5:302020-12-24T18:11:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्यातील एका लग्न समारंभातून चोरीस गेलेले १९ लाख तीन हजारांचे ४२ तोळे सोन्याचे दागिने ...

Thane police have seized 42 ounces of gold jewelery stolen from a wedding party in Madhya Pradesh | लग्न समारंभातून चोरीस गेलेले ४२ तोळे सोन्याचे दागिने ठाणे पोलिसांनी मध्यप्रदेशातून केले हस्तगत

कासारवडवली पोलिसांची कामगिरी

Next
ठळक मुद्दे कासारवडवली पोलिसांची कामगिरी १९ लाखांचे दागिने जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यातील एका लग्न समारंभातून चोरीस गेलेले १९ लाख तीन हजारांचे ४२ तोळे सोन्याचे दागिने थेट मध्यप्रदेशातील एका गावातील चोरटयांच्या घरातून हस्तगत करण्यात कासारवडवली पोलिसांना यश आल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी गुरुवारी दिली. यातील आरोपींचा अजूनही शोध घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
घोडबंदर रोडवरील ओवळा येथील ‘जलसा लॉन’ येथे अनिता सिंग यांच्या मुलाचा ३० नोव्हेंबर २०२० रोजी विवाहसोहळा सुरु होता. त्यावेळी नवरा नवरी बरोबर रात्री १० वाजण्याच्या सुमारास फोटो काढले जात असतांना अनिता यांनी खुर्चीवर ठेवलेली सोन्याच्या दागिन्यांची बॅग अवघ्या काही क्षणांमध्ये तिथून चोरीस गेली होती. या बॅगेत सोन्याच्या दागिन्यांसह, दोन मोबाईल आणि ९० हजारांची रोकडही होती. याप्रकरणी १ डिसेंबर २०२० रोजी कासारवडवली पोलीस ठाण्यात अनिता यांनी दिलेल्या तक्रारीवरुन चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार, निरीक्षक जयराज रणवरे, अविनाश काळदाते, वैभव धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सहादेव पालवे, पोलीस हवालदार उदय कोरे, राजेंद्र चौधरी आणि पोलीस नाईक तुषार पाटील आदींच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण तसेच सीसीटीव्हीतील चित्रणाच्या आधारे थेट मध्यप्रदेशातील राजगढ जिल्हयातील गुलखेडी गावातून अट्टल चोरटा बबलू सिसोदिया याचे घर शोधले. बबलूने त्याच्या अन्य दोन साथीदार तसेच एका दहा वर्षीय मुलाच्या मदतीने ही चोरी केल्याचे तपासात उघड झाले. बबलूचे नाव यामध्ये निष्पन्न झाल्यानंतर त्याच्या मध्यप्रदेशातील घरात २० डिसेंबर २०२० रोजी अचानक झडती घेऊन पालवे यांच्या पथकाने चोरीस गेलेल्या एक लाख ५७ हजारांच्या सोन्याच्या मंगळसूत्रासह तब्बल ४२३ ग्रॅम वजनाचे १९ लाख तीन हजार ५०० रुपयांचे जवळपास सर्वच सोन्याचे दागिने हस्तगत केले. चोरीतील दोन मोबाईल आणि ९० हजारांची रोकड मात्र या झडतीमध्ये मिळाली नाही. पोलिसांची चाहूल लागल्यानंतर बबलूसह त्याचे साथीदार मात्र तिथून पसार झाले. त्यांनाही लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास डॉ. राठोड यांनी व्यक्त केला.
* अल्पवयीन मुलाचा चोरीसाठी वापर:
अवघ्या दहा वर्षांच्या मुलाच्या मदतीने या आंतरराज्य टोळीने लग्नसमारंभातून सोन्याचे दागिने आणि रोकड असलेली बॅग लंपास केली. पकडले गेलेच तर अल्पवयीन मुलाचा समावेश असल्यामुळे प्रकरण फारसे पुढे जात नाही. याचाच गैरफायदा घेऊन यात मुलाचा वापर केल्याची बाब समोर आली. मुलाने बॅग ताब्यात घेतल्यानंतर बाहेर आधीच तयारीत असलेले हे टोळके एका वाहनातून पळून गेले होते. मध्यप्रदेशातील गुलखेडी या गावात बहुसंख्येने असे चोरटे असल्याचीही बाब तपासात समोर आली.

Web Title: Thane police have seized 42 ounces of gold jewelery stolen from a wedding party in Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.