इफेड्रीनचा साठा नष्ट करण्यात ठाणे पोलिसांना अडथळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 05:52 AM2018-05-18T05:52:28+5:302018-05-18T05:52:28+5:30
येत्या २८ मे रोजी होणाऱ्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा फटका ठाणे शहर पोलिसांना बसला आहे. शहर पोलिसांनी जप्त केलेला सोलापूरच्या एव्हॉन लाइफ सायन्सेस लिमिटेड कंपनीतील कोट्यवधी रुपयांच्या इफेड्रीन ड्रग्जचा साठा येत्या २६ आणि २७ मे रोजी नष्ट केला जाणार होता.
ठाणे : येत्या २८ मे रोजी होणाऱ्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा फटका ठाणे शहर पोलिसांना बसला आहे. शहर पोलिसांनी जप्त केलेला सोलापूरच्या एव्हॉन लाइफ सायन्सेस लिमिटेड कंपनीतील कोट्यवधी रुपयांच्या इफेड्रीन ड्रग्जचा साठा येत्या २६ आणि २७ मे रोजी नष्ट केला जाणार होता. मात्र, पालघर पोटनिवडणुकीमुळे आता जून महिन्यात हा साठा नष्ट केला जाण्याची शक्यता एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने वर्तवली आहे. तसेच हा साठा नष्ट करण्यासाठी पावणेआठ लाखांचा खर्च होणार आहे.
डायघरमध्ये १० एप्रिल २०१६ रोजी इफेड्रीन ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या नायजेरियन तरुणाला अर्धा किलो ड्रग्जसह कल्याण गुन्हे शाखेने पकडले होते. तपास करताना, ठाणे पोलिसांनी सोलापूर हे या ड्रग्जचे प्रमुख केंद्र तसेच राष्टÑीय, आंतरराष्टÑीय ड्रग्जमाफिया यात गुंतल्याचे पोलिसांनी समोर आणले होते. याप्रकरणी आतापर्यंत १५ जणांना अटक झाली आहे. अभिनेत्री ममता कुलकर्णी, तिचा पती विकी गोस्वामी यांना फरार घोषित केले आहे.
दरम्यान, ठाणे पोलिसांनी जप्त केलेला इफेड्रीन, सुडो इफेड्रीन, असेटिक अनहायड्रेड ड्रग्ज असा सुमारे २३ टन साठा असून सध्या सोलापूर येथील एव्हॉन लाइफ सायन्सेस लिमिटेड कंपनीत पोलीस बंदोबस्तात आहे. त्याची विल्हेवाट लावण्याबाबत मागील वर्षी जूनमध्ये ठाणे न्यायालयाने आदेश दिले. त्यानुसार, पुण्यातील रांजणगाव येथे २६ आणि २७ मे ही तारीख निश्चित केली होती. मात्र, सध्या पालघर पोटनिवडणुकीचा रणसंग्राम सुरू असल्याने ठरलेल्या दिवशी साठा नष्ट होणे अशक्य असल्याचे पोलीस अधिकाºयाने सांगितले. परिणामी, पुन्हा नव्याने तारीख निश्चित करून तो साठा नष्ट करावा लागेल. कदाचित, जूनमध्ये हा साठा नष्ट केला जाऊ शकतो, असेही त्या अधिकाºयाने बोलताना सांगितले.