ठाणे पोलीस ओडिशाला रवाना, २२ पेट्रोलपंपांची करणार तपासणी, एक पेट्रोलपंप नक्षलग्रस्त भागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 03:14 AM2017-09-17T03:14:10+5:302017-09-17T03:14:32+5:30
पेट्रोलपंप घोटाळ्याप्रकरणी अटक केलेल्या तंत्रज्ञ टेक्निशियन यांच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार ठाणे गुन्हे शाखेचे एक पथक ओडिशाला रवाना झाले आहे. तेथे हे पथक सुमारे २२ पंपांची तपासणी करणार आहे.
ठाणे : पेट्रोलपंप घोटाळ्याप्रकरणी अटक केलेल्या तंत्रज्ञ टेक्निशियन यांच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार ठाणे गुन्हे शाखेचे एक पथक ओडिशाला रवाना झाले आहे. तेथे हे पथक सुमारे २२ पंपांची तपासणी करणार आहे. त्यातील एक पंप नक्षलग्रस्त भागात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पेट्रोलपंपांवरील डिझेल-पेट्रोल डिस्पेन्सिंग युनिटमधील पल्सरकार्ड, मदरबोर्ड, कंट्रोलकडे की, पॅड यामध्ये फेरफार करून ग्राहकांना कमी डिझेल-पेट्रोल वितरित होत असल्याचे कारवाईत निष्पन्न झाले होते. त्यानुसार, महाराष्टÑातील २१ जिल्ह्यांत तर ओडिशा राज्यातील २ ठिकाणी अशा एकूण १७८ पेट्रोलपंपांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये ५ पेट्रोलपंपमालक-चालक, ६ मॅनेजर, ७ खासगी आणि ८ अधिकृत तंत्रज्ञ (टेक्निशियन), एक माजी सॉफ्टवेअर इंजिनीअर, एक मुख्य सूत्रधार आयसी बनवणारा, एक आयसी विक्री करणारा अशा एकूण २९ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी २३ जणांविरोधात कल्याण न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
दरम्यान, नुकत्याच ओडिशातून अटक केलेल्या खासगी तंत्रज्ञ डंबरूधर मोहंतो याच्या चौकशीत तेथील आणखी २२ पंपांची माहिती पुढे आली आहे. त्यातील एक नक्षलग्रस्त भागात आहे. मात्र, ते पेट्रोलपंप कुठे आणि नेमके कोणाचे आहेत, याबाबत गुप्तता ठेवण्यात आली आहे. त्या पंपांच्या तपासणीसाठी ठाणे शहर पोलिसांचे सहा जणांचे पथक ओडिशाला रवाना झाले आहे. त्यामुळे हा घोटाळा उत्तर प्रदेश, महाराष्टÑापाठोपाठ ओडिशामध्येही तितक्याच मोठ्या प्रमाणात झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच अहिरे याच्याकडून काही नवीन माहिती पुढे आली आहे. तेथेही तपासणी केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मालकांना न्यायालयीन कोठडी
हाजीमलंग रोडवरील सद्गुरू पेट्रोलपंपचे बाळाराम गायकवाड आणि काटई साई पेट्रोलपंपचे संजय कुमार सरजू प्रसाद यादव या दोघांना शुक्रवारी, तर रायगड येथील समर्थ कृपा पेट्रोलपंपाचे जयदास तरे यांना शनिवारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे एकूण २९ आरोपींपैकी २७ जणांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.
तंत्रज्ञांना पोलीस कोठडी
डंबरूधर याला शुक्रवारी न्यायालयाने दोन दिवसांची, तर शनिवारी विनोद अहिरे याला न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी दिली. या प्रकरणी या दोघांकडून आणखी माहिती पुढे येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.