पकडलेल्या सोनसाखळी चोरट्यांकडून ठाणे पोलिसांची दिशाभूल: विसंगत माहितीमुळे तारेवरची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 07:01 PM2017-12-20T19:01:21+5:302017-12-20T19:08:58+5:30
ठाण्याच्या नोपाडा पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतलेल्या कुख्यात सोनसाखळी चोरटयांनी दुस-या दिवशीही तोंड उघडले नाही. त्यांनी दिलेल्या विसंगत माहितीमुळे तपास पथकाला मात्र तारेवरची कसरत करावी लागत आहे.
ठाणे : भिवंडीच्या शांतीनगर परिसरातून ताब्यात घेतलेल्या तीन इराणी चोरट्यांनी अजूनही तोंड उघडलेले नाही. वेगवेगळी उत्तरे देऊन तपास पथकाची ते चांगलीच दिशाभूल करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे, मुंबई परिसरात महिलांची मंगळसूत्र तसेच सोनसाखळी खेचून दुचाकीवरून पलायन करणाºया एका २४ वर्षीय ‘टॉप २०’ मधील कुख्यात गुंडासह इराणी टोळीतील या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या पथकाने ताब्यात घेतले. दोन दिवस सापळा लावल्यानंतर हे टोळके पळून जाण्याच्या बेतात असतांनाच निरीक्षक संजय धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत ओऊळकर, तसेच २५ ते ३० जणांच्या पथकाने भिवंडीच्या इराणी वस्तीमध्ये शिरून या चोरट्यांना मंगळवारी सकाळी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सोनसाखळी चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. या तिघांनाही ताब्यात घेतेवेळी इराणी वस्तीतील त्यांच्या कुटूंबियांनी पोलीस पथकाला कडवा विरोध केला होता. मोठा जमावही त्याठिकाणी जमा झाला होता. महिलांना हिसका देऊन मंगळसूत्र किंवा त्यांची सोनसाखळी हिसकावण्यात माहिर असलेले हे टोळके पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यातही चांगलेच तरबेज आहे. त्यामुळेच ते आता वेगवेगळी उत्तरे देऊन तपास पथकाची दिशाभूल करीत आहेत. सोनसाखळी हिसकावल्याची कबुली देतांनाच पुन्हा त्याच बाबीची विसंगत माहिती ते देत असल्यामुळे त्यांनी चोरलेल्या मुद्देमालाची माहिती काढणे, तो त्यांच्याकडून हस्तगत करणे ही तारेवरची कसरत पोलिसांना करावी लागत आहे. त्यांनी दिलेल्या माहितीमधील एखादी जरी कडी जुळली तरी अनेक बाबी उघड होऊ शकतात. त्यातून अनेक गुन्हे उघड होऊन त्यांच्या साथीदारांचीही माहिती मिळू शकते. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी दडवून ठेवलेल्या किंवा विक्री केलेल्या मालाची माहिती मिळू शकेल, असेही पोलिसांनी सांगितले. सध्या तरी त्यांच्याकडून कोणतीही ठोस माहिती मिळालेली नसल्यामुळे त्यांना अटक केली नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी ‘लोकमत’ला सांगितले.