कोणत्याही अमिषाला बळी न पडता लोकाभिमुख काम करा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 09:39 PM2019-11-01T21:39:27+5:302019-11-01T21:40:12+5:30
तंत्रज्ञानाचे सुयोग्य वापर करत सरकारी कामामध्ये पारदर्शकता ठेवून अधिकारी- कर्मचारी यांनी शासकीय सेवांचा लाभ नागरिकांना जलद गतीने देण्यासाठी प्रयत्न करावे. शासकीय सेवकांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडता लोकाभिमुख काम करण्याचे कर्तव्य पार पाडावे.
ठाणे - तंत्रज्ञानाचे सुयोग्य वापर करत सरकारी कामामध्ये पारदर्शकता ठेवून अधिकारी- कर्मचारी यांनी शासकीय सेवांचा लाभ नागरिकांना जलद गतीने देण्यासाठी प्रयत्न करावे. शासकीय सेवकांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडता लोकाभिमुख काम करण्याचे कर्तव्य पार पाडावे. आपण जनतेचे सेवक असल्याची भावना कायम मनात दृढ करून सर्व प्रकारच्या प्रलोभना पासून दूर राहण्याचे आवाहन पोलीस अधिक्षक ( अॅन्टी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे ) डॉ. महेश पाटील यांनी केले. ठाणे जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या अधिकारी – कर्मचारी वर्गासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
'ईमानदारी एक जीवनशैली' ही संकल्पना घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) यंदा 'दक्षता जनजागृती सप्ताह' राबवला जात आहे. शुक्रवार १ नोव्हेंबर 2019 रोजी नियोजन भवन येथे जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचार्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक मुकुंद हातोटे म्हणाले, शासकीय अधिकारी- कर्मचारी यांनी त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक नागरिकाचे काम कोणत्याही अडवणूकीविना न होता तत्परतेने आणि पारदर्शीपणे कसे होईल यासाठी प्रयत्न करावे. लाच घेणे आणि देणे हा गुन्हा आहे. आपण शासकीय सेवक आहोत याचे भान ठेवून आपली सेवा बजावायला हवी असे त्यांनी उपस्थितांना सागितले.
यावेळी व्यासपीठावर निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील, तहसीलदार राजेंद्र चव्हाण ( महसूल ) उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( पंचायत ) अशोक पाटील, शिक्षणाधिकारी ( माध्यमिक ) शेषराव बढे, शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) संगीता भागवत, कार्यकारी अभियंता लघुपाटबंधारे श्री.इंदुरकर, कार्यकारी अभियंता ( बांधकाम ) पालवे, पो. उप. अधिक्षक (एसीबी ) मदन बल्लाळ, पोलीस उप अधिक्षक शशिकांत चांदेकर, पोलीस निरीक्षक लक्ष्मण राठोड, पोलीस निरीक्षक रणजित पठारे, आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्री. शिवाजी पाटील आणि श्री. अशोक पाटील यांनी समोयोचीत भाषण केले. तर पो. उप. अधिक्षक (एसीबी ) मदन बल्लाळ यांनी भ्रष्टाचार निर्मूलना संदर्भात तयार करण्यात आलेल्या विविध लघुचित्रफित, प्रसिद्ध मान्यवरांचे दृकश्राव्य माध्यमातील प्रतिक्रिया उपस्थितांना दाखवल्या. हा सप्ताह २८ ऑक्टोबर पासून सुरु झाला आहे. या निमित्ताने लाचलुचपत विभागा अंतर्गत विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. या कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेचे अधिकारी – कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.