गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ठाणे पोलिसांची आता ‘फूट - पेट्रोलिंग’
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 08:25 PM2017-09-18T20:25:30+5:302017-09-18T20:26:03+5:30
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच गुन्हेगारांवर वचक राहण्याबरोबर नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी ठाणे पोलिसांनी आपल्या कार्यक्षेत्रात ‘फूट- पेट्रोलिंग’ अर्थात पायी गस्तीला सुरुवात केली आहे
ठाणे, दि. 18 : गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच गुन्हेगारांवर वचक राहण्याबरोबर नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी ठाणे पोलिसांनी आपल्या कार्यक्षेत्रात ‘फूट- पेट्रोलिंग’ अर्थात पायी गस्तीला सुरुवात केली आहे. ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या संकल्पनेतून या अभिनव उपक्रमास सुरुवात करण्यात आली आहे.
पायी गस्त घालण्यामुळे दृश्य पोलिसींग राहणार असून नागरिक आणि पोलीस यांच्यात थेट संवाद निर्माण होण्यास अधिक मदत होणार आहे. अलिकडेच मुबई पोलिसांनी सायकलवरील गस्त सुरु केली आहे. त्याच धरतीवर ठाणे पोलिसांनी ही ‘फूट पेट्रोलिंग’ची संकल्पना अमलात आणली आहे. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे शहर, वागळे इस्टेट, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या पाचही परिमंडळांमधील ३५ पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये दिवसातील ठराविक वेळेमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह काही अधिकारी आणि कर्मचारी हे गस्त घालणार आहेत. यामध्ये संवेदनशील ठिकाणे, शाळा, महाविद्यालय, मार्केट परिसराचा भाग निवडला जाणार आहे. ठाण्यात शनिवार पासून वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील रामचंद्रनगर आणि ज्ञानेश्वरनगर भागात गस्त घालून या योजनेची सुरुवात केली. रविवारी वागळे इस्टेट भागातील आंबेवाडी तर सोमवारी अंबिकानगर भागात त्यांच्या पथकाने गस्त घातली. यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पोलिसांच्या नविन संकल्पनेचे स्वागत करुन काही गाºहाणीही त्यांच्याकडे मांडल्या.
पोलीस आणि जनता यांचे नातेही यातून दृढ होण्यास मदत होणार असल्याचे पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. नाक्यावर, शाळा, कॉलेज आणि मार्केट परिसरात फिरणारी टवाळखोर मुले यांच्यावरही अंकुश राहणार असून पाकिटमार, सोनसाखळी चोर यांच्यावरही यातून लक्ष केंद्रीत केले जाणार असल्याचे पूर्व प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर यांनी सांगितले.
‘‘ पायी पेट्रोलिंगमुळे पोलिसांना परिसराची अधिक व्यापक प्रमाणात ओळख होईल. नागरिकांमध्येही पोलिसांमुळे सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. तसेच गुन्हेगारांवर वचक राहण्यासाठी ‘फूट- पेट्रोलिंग’ करण्यात येणार आहे. यामध्ये एक निरीक्षक, २ उपनिरीक्षक आणि साते ते आठ कर्मचाºयांचा समावेश राहणार आहे. त्यामुळे एखादी घटना घडली तर तात्काळ पोलीसही उपलब्ध होणार आहेत.’’
सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे