मंदिरातील सेवेकरी, पुजाऱ्यांची नोंद ठेवण्याचे ठाणे पोलिसांचे आदेश; संघटनेच्या मागणीला यश
By जितेंद्र कालेकर | Published: September 20, 2024 11:21 PM2024-09-20T23:21:14+5:302024-09-20T23:22:42+5:30
दाेन महिन्यांपूर्वी विवाहितेवर झाला हाेता बलात्कार
जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: काही महिन्यांपूर्वी डायघर भागातील एका मंदिरातील पुजारी आणि सेवेकरींनी एका विवाहितेवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याची घटना घडली होती. त्यामुळे मंदिरातही महिला सुरक्षित नसल्याच्या तीव्र भावना निर्माण झाल्या होत्या. त्यानंतर ठाण्यातील समाजसेवक तथा ठाणे जिल्हा भुमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष कोळी, प्रफुल वाघोले, मनीष वैती, मेघनाथ घरत, समीर भोईर यांनी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडे मंदिरातील सेवेकरी आणि पुजारी यांची माहिती पोलिसांना देऊन पोलीस व्हेरिफिकेशन करण्याची मागणी केली होती.
या मागणीनंतर पोलिसांनी या मागणीची गांभिर्याने दखल घेत ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व मंदिरांतील सेवेकरी व पुजार्यांची माहिती संकलित करण्याचे आदेश स्थानिक पोलीस ठाण्यांना दिले आहेत. शाळा, मंदिर आणि आरोग्य, व्यावसायिक सर्वच क्षेत्रांत दिवसेंदिवस महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढत असून महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागत आहे. अशावेळी महिलांच्या सुरक्षेसाठी शासन स्तरावर राज्य सरकारकडूनही कठोर पावले उचलली जात आहेत. मात्र डायघर मधील मंदिरात सेवेकरी आणि पुजार्यांनी केलेल्या अत्याचारासह हत्येच्या घटनेनंतर दिव्यासह ठाणे शहर हादरले होते.
सर्वत्र तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान, ठाण्यातील समाजसेवक अक्षय कोळी यांनी ठाण्याचे पोलीस आायुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडे मंदिरातील सेवेकरी व पुजारी यांचे पोलीस व्हेरिफिकेशन करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पोलिस आयुक्तांनी याबाबत गांभिर्याने दखल घेत स्थानिक पोलीस ठाण्यांना शहरातील सर्व मंदिरातील सेवेकरी व पुजारी यांची माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहेत. भुमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष कोळी यांच्यासह शिष्टमंडळाच्या मागणीला यश आल्याने मंदिर परिसरात मुली- महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांना आळा बसू शकेल, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.