लॉकडाऊनच्या बंदोबस्तासाठी ठाणे पोलीस पुन्हा सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 01:11 AM2021-04-10T01:11:35+5:302021-04-10T01:15:56+5:30
गेल्या पाच दिवसांपासून अंशत: सुरु असलेले लॉकडाऊन शनिवारी आणि रविवारी पूर्णत: राहणार आहे. त्यासाठी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील नाक्या नाक्यांवर पोलिसांची कुमक तैनात केली आहे. राज्य राखीव दलाच्या चार तुकडयांसह होमगार्डचेही ४५० जवान या बंदोबस्तासाठी तैनात केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : गेल्या पाच दिवसांपासून अंशत: सुरु असलेले लॉकडाऊन शनिवारी आणि रविवारी पूर्णत: राहणार आहे. त्यासाठी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील नाक्या नाक्यांवर पोलिसांची कुमक तैनात केली आहे. राज्य राखीव दलाच्या चार तुकडयांसह होमगार्डचेही ४५० जवान या बंदोबस्तासाठी तैनात केले आहे. त्यामुळे आता लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवर साथ प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे.
मार्च २०२० पासून कोरोनाची साथ रोखण्यासाठी पोलिसांनी जीवाची पर्वा न करता बंदोबस्ताबरोबरच अनेकांना मदतीचा हात दिला. यात शेकडो पोलीस बाधित झाले तर ३५ हून अधिक पोलिसांना आपला जीव गमवावा लागला. आता पुन्हा कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने वाढत आहे. ती रोखण्यासाठी ठाणे पोलीस पुन्हा सज्ज झाले आहेत. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर निर्बंध लागू केले आहेत. ५ एप्रिल २०२१ पासून लागू केलेल्या या निर्बंधांमध्ये सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत मनाई आदेश लागू केला आहे. यात पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. याशिवाय, सोमवार ते शुक्रवार रात्री ८ ते सकाळी ७ या दरम्यान अत्यावश्यक कारणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास बंदी आहे.
याव्यतिरिक्त शुक्रवार आणि शनिवारी संपूर्ण लॉकडाऊनसह संचारबंदीही लागू आहे. त्यामुळे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळामध्ये साडे तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त गस्तीसाठी तैनात केला आहे. प्रत्येक परिमंडळाच्या पातळीवरही हा बंदोबस्त असून
विनाकारण फिरणाºया नागरिकांवर साथ प्रतिबंधक कायद्याखाली कारवाई केली जाणार आहे. या काळात अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त दुकाने खुली ठेवणारे तसेच कोरोनाची दर १५ दिवसांनी चाचणी न करणारे व्यावसायिक आणि त्यांचे कामगार यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
* लॉकडाऊन काळामध्ये बस, रेल्वे, खासगी बस आणि रिक्षा सुरु राहणार आहे. बसमध्ये उभे राहून प्रवासाला बंदी राहील. मास्क शिवाय, प्रवेश नसेल. रिक्षामध्ये दोन पेक्षा अधिक प्रवाशांना मुभा नाही.
* नागरिकांसाठी पोलीस रस्त्यावर
कोरोनाचे संकट पुन्हा आपल्यावर येऊ नये म्हणून प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. कोरोनाचा प्रादुर्भाव मी करणार नाही आणि होऊ देणार नाही, असे म्हणत प्रत्येकाने ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. त्याच बरोबर सामाजिक अंतर पाळून गर्दी टाळावी आणि मास्कचा वापर करावा, असे आवाहन ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी केले आहे. काही भागांमध्ये इच्छा नसतानाही नाईलाजाने कारवाई करावी लागत आहे. हे टाळण्यासाठी आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने घालून दिलेले नियम पाळण्याचे आवाहन फणसळकर यांनी केले.