राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस बंदोबस्तासाठी सज्ज
By जितेंद्र कालेकर | Published: January 18, 2024 08:03 PM2024-01-18T20:03:21+5:302024-01-18T20:04:14+5:30
शहरातील धार्मिक स्थळांवरही पोलिसांची करडी नजर
ठाणे: अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन कार्यक्रमासाठी ठाणे शहर पोलिसही सतर्क झाले आहेत. पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशाने शहरात महत्वाच्या ठिकाणी विशेष बंदोबस्त सुरू केला आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगारांची यादीही तयार केली जात असून त्यांच्या हालचालींवर नजर ठेवली जात आहे. शहरातील संवेदशील आणि मोठया धार्मिक स्थळांवर पोलिसांची २४ तास नजर राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन, मराठा आरक्षण आणि राज्यात येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर राज्यातील गुन्हेगारी कारवायांवर लक्ष ठेवण्याचे आदेश गृहमंत्रालयाकडून पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यांनी विशेष गस्त घालण्याचे काम सुरू केले आहे. संवेदनशील ठिकाणांसह इतर महत्वाचे नाके, चौक, बाजारपेठा, गदीर्ची ठिकाणे, हॉटेल तसेच लॉज आदी भागात १७ जानेवारीपासूनच नाकाबंदी, तपासणी सुरू केली आहे. रेकॉर्डवरील आरोपींचाही धांडोळा घेतला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन होत आहे. तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनीही मुंबईत आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यासाठी ठाण्यातून मोठ्या प्रमाणात आंदोलनकर्ते जमा होऊ शकतात, अशी शक्यता पोलिसांच्या गोपनीय शाखेने वर्तविली आहे. आगामी निवडणूकांपूवीर्च पोलिसांकडून गुन्हे प्रतिबंधक कारवायांनाही सुरुवात केली आहे. ठाण्यातील सर्व पोलीस ठाण्यात संबंधित पोलिस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन रात्री, पहाटे आणि सकाळच्या वेळेत गस्त सुरू केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून पूर्व खबरदारी घेतली जात आहे. बाहेरुन येणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी नाकाबंदी केली जात आहे. सीसीटिव्ही मार्फत तसेच साध्या वेशातील पोलिसांकडून संवेदनशील भागात नजर ठेवली जात आहे. ठाण्यातील सर्वच पोलिस उपायुक्तांच्या बैठका बोलावून पाेलिस आयुक्तांनी बंदोबस्ताचा आढावाही घेतला आहे. त्यांना आवश्यक निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा रूट मार्च देखील काढला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
संपूर्ण आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग सुरू केली आहे. पोलिस दल सर्तक असून अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व प्रकारची खबरदारी घेतली जात आहे.
दत्तात्रय कराळे, सह पोलिस आयुक्त, ठाणे शहर