ठाण्यात १५६ आरोपींकडून २३० वाहने हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 09:19 PM2018-11-06T21:19:32+5:302018-11-06T21:35:21+5:30
वाढत्या वाहन चोरीवर नियंत्रण आणण्याबरोबरच या गुन्हयांचा छडा लावण्याचे आदेश ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी ठाण्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्याच गुन्हे आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिले होते. याच पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी २०७ गुन्हे उघड करुन १५६ आरोपींकडून २३० वाहने जप्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : वाहन चोरांच्या गुन्हे कार्यप्रणालीची माहिती काढून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वेगवेगळ्या पथकांनी गेल्या दोन महिन्यांमध्ये वाहनचोरीचे २०७ गुन्हे उघड केले. यात १५६ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून तब्बल २३० वाहने हस्तगत केल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रविण पवार यांनी मंगळवारी आयुक्तालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी ठाणे आयुक्तालयाची सूत्रे स्वीकारल्यानंतर घेतलेल्या मासिक गुन्हे आढावा दरम्यान वाढत्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्याचे तसेच हे गुन्हे उघड करण्याचे आदेश सर्व पोलीस अधिकाºयांना दिले होते. विविध वाहन चोरांच्या गुन्हे कार्यप्रणालीबाबत माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबतही त्यांनी याच बैठकीमध्ये मार्गदर्शन केले होते. त्यानुसार आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेतील मालमत्ता शोध पथक कक्ष, खंडणीविरोधी पथक आणि गुन्हे युनिट क्रमांक एक ते पाच यांनी मिळून वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी वेगवेगळी पथके तयार केली. रात्रंदिवस वाहन चोरी तसेच रेकॉर्डवरील आरोपींच्या हालचालींवर पाळत ठेवून काही ठिकाणी आरोपींना रंगेहाथ पकडले. तर काही ठिकाणी मागोवा काढून त्यांना शिताफीने वाहनांसकट जेरबंद केले. त्यांच्याकडून आतापर्यंत २३० वाहने हस्तगत केली आहेत.
दुचाकी वाहने चोरणाºया टोळीपैकी काही आरोपी हे वाहनांच्या बनावट चाव्या बनवून वाहन चोरी करीत होते. तर काही चोरटे दुचाकी वाहनांचे हॅन्डल लॉकला जोरदार हिसका मारून ते तोडत. त्यानंतर गाडी थोडी पुढे ढकलून इग्नीशनची वायर जोडून गाडी थेट सुरू करून ते चोरी करीत असल्याचे तपासात उघड झाले. तर अन्य एक वाहन चोरी करणारी टोळी अपघातात पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या वाहनांची इन्शुरन्स कंपनीकडून खरेदी करीत करायचे. त्यांच्या चेसीस क्रमांकाची पट्टी काढून त्याच प्रकारच्या मॉडेलच्या गाड्या चोरी करून त्यावर लावत असत. अशा चोरलेल्या वाहनांच्या इंजिन क्रमांक घासून ते नष्ट करून पुढे त्यांची विक्री करीत असल्याचेही तपासात उघड झाले आहे. अशाच प्रकारे ठाणे शहर आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, अंबरनाथ आणि कल्याण आदी ठिकाणी वाहन चोरी करणा-या अनेक टोळ्यांना जेरबंद केल्याचेही पवार यांनी सांगितले.
आॅगस्ट ते आॅक्टोबर २०१८ या दोन महिन्यांच्या काळात वाहन चोरीचे २०१७ गुन्हे उघडकीस आणले. यात १५६ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून २३० वाहने हस्तगत केली आहेत. हस्तगत केलेल्या वाहनांपैकी २३ दुचाकी तर एका चारचाकी वाहनाचे मालक मिळालेले नाहीत. या वाहनांचे चेसिस आणि इंजिन क्रमांक मेक मॉडेल आदी माहिती सर्व पोलीस ठाण्यांमध्ये वितरीत केली आहे. त्यामुळे ज्यांची वाहने चोरीस गेली आहेत, पण ती मिळाली नसतील त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून चेसिस आणि इंजिन क्रमांकाची खात्री करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.