तळीरामांकडून एक कोटी ८७ लाख ४५ हजार ९०० रुपयांची वसुली, ठाणे पोलिसांचा हिसका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 01:07 AM2020-03-18T01:07:41+5:302020-03-18T01:08:27+5:30
मोटारवाहन कायद्याचा भंग करून स्वत:सोबतच इतरांचेही जीव धोक्यात घालणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांमार्फत दंडात्मक कारवाई केली जाते, तर पोलिसांकडूनही अशी कारवाई होते.
ठाणे : शासकीय यंत्रणा कोरोनावर लक्ष केंद्रित करीत असतानाच पोलीस आणि वाहतूक विभागाने मात्र मोटारवाहन कायदा भंग करणाऱ्यांवर वॉच ठेवला आहे. वाहतूक पोलिसांनी अवघ्या दोन महिन्यांत ५७,०८४ जणांवर कारवाई करून ५८,०६,४०० रु पयांचा दंड वसूल केला आहे. झोन ५ च्या पोलिसांनीही मोटारवाहन कायदा भंग करणाºयासोबतच सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाºया १,८२३ जणांना कायद्याचा हिसका दाखवून गेल्या १४ महिन्यांत एक लाख ९५ हजार ६४७ जणांवर कारवाई करून, तीन कोटी ७१ लाख ४६ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये तळीरामांकडून याच कालावधीत एक कोटी ८७ लाख ४५ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
मोटारवाहन कायद्याचा भंग करून स्वत:सोबतच इतरांचेही जीव धोक्यात घालणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांमार्फत दंडात्मक कारवाई केली जाते, तर पोलिसांकडूनही अशी कारवाई होते. परिमंडळ ५ मधील पोलिसांनी एका महिन्यात १७,४१२ वाहनचालकांवर गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून दंड वसूल केला आहे. तर वाहतूक पोलिसांनी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात विनाहेल्मेट, विना सेफ्टीबेल्ट, चुकीच्या दिशेने वाहन चालविणे, नो एन्ट्री, वाहन चालवताना मोबाइलवर बोलणे, वेगात गाडी चालविणे, ट्रिपल सीट, दारू पिऊन गाडी चालविणे, या गुन्ह्यांसाठी जानेवारी आणि फेब्रुवारी २०२० या दोन महिन्यांत ५७,०८४ जणांवर दंडात्मक कारवाई करून ५७,०६,४०० रु पयांचा दंड
वसूल केला.
२०१९ या वर्षभरात याच गुन्ह्यासाठी १,९५,६४७ वाहनचालकांकडून ३,७१,४६,४०० रुपयांचा दंड वसूल केला. विनाहेल्मेट गाडी चालविणाºयांचा या दंडात्मक कारवाईत जास्त समावेश आहे. १४ महिन्यांत ८६,८२३ जणांचा समावेश असून, त्यांच्याकडून तब्बल ४८,७७,३०० दंड वसूल केला आहे. तर दारू पिऊन गाडी चालविणाºयांची संख्याही लक्षणीय आहे. तर १४ महिन्यांत १२,१३२ तळीरामांचा यात समावेश आहे. त्यांच्याकडून १,८७,४५,९०० एवढा दंड वसूल केला आहे. वाहतूक विभागाने ठाणे पोलीस आयुक्तालयात ही कारवाई केली.
सिगारेट पिणाºया १,८२३ जणांवर कारवाई
परिमंडळ ५ च्या पोलिसांनीही फेब्रुवारी महिन्यात तळीरामांसोबतच सार्वजनिक ठिकाणी सिगारेट पिणाºया १,८२३ जणांवर गुन्हे दाखल करून कारवाई केली.