मुंब्य्रातून अपहरण झालेल्या मुलीची सोलापूरातून सुटका: ठाणे पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 09:35 PM2018-10-12T21:35:17+5:302018-10-12T21:52:59+5:30
मुंब्य्रातील एका अल्पवयीन मुलीला लग्नाच्या अमिषाने सोलापूरमध्ये आपल्या मुळ गावी पळवून नेणाऱ्या सुरज कसबेला ठाणे गुन्हे शाखा आणि सोलापूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाईने सोलापूरातून अटक केली आहे. या मुलीचीही त्याच्या तावडीतून सुखरुप सुटका केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: लग्नाचे अमिष दाखवून मुंब्य्रातून एका १५ वर्षीय मुलीचे अपहरण करणा-या सुरज कसबे (२३, रा. मुंब्रा, ठाणे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एक ने सोलापूरातून अवघ्या ३० तासांमध्ये गुरुवारी अटक केली. या मुलीला शुक्रवारी सुखरुप तिच्या पालकांच्या स्वाधीन केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंब्य्रातील या अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार १० आॅक्टोंबर रोजी मुंब्रा पोलीस ठाण्यात तिच्या पालकांनी दाखल केली होती. या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी गुन्हे अन्वेषण विभागाकडेही समांतर तपास दिला होता. या मुलीला सुरज (मुळ रा. कोरफळे, ता. बार्शी, जि. सोलापूर) याने सोलापूर येथे पळवून नेले असून तो तिच्यासह त्याच्या गावी गेल्याची टीप सहायक पोलीस निरीक्षक समीर अहिरराव यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अशोक माने, पोलीस नाईक संजय बाबर, भगवान हिवरे या पथकाने सोलापूरातील स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, जमादार आबा शिंदे आणि हवालदार जाधव यांच्या मदतीने कोरफळे गावातून ११ आॅक्टोंबर रोजी रात्री १० वा. च्या सुमारास सुरजला ताब्यात घेऊन मुलीची सुटका केली. त्याला शुक्रवारी मुंब्रा पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.