ठाण्यातील बेपत्ता मुलाचा काही तासांमध्ये पोलिसांनी घेतला शोध : अपहरणकर्त्यास विठ्ठलवाडीतून अटक
By जितेंद्र कालेकर | Published: October 15, 2018 11:30 PM2018-10-15T23:30:45+5:302018-10-15T23:30:45+5:30
फिरायला नेण्याच्या बहाण्याने ठाण्याच्या घोडबंदर रोड येथील एका १३ वर्षीय मुलाचे अपहरण करणाऱ्या देवानंद शर्मा या सुरक्षा रक्षकाला कासारवडवली पोलिसांनी विठ्ठलवाडी येथून अटक केली आहे. मुलाच्या सुखरुप सुटकेमुळे पालकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.
जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : घोडबंदर रोड येथून अपहरण झालेल्या एका तेरावर्षीय मुलाचा अवघ्या सहा ते सात तासांमध्ये कासारवडवली पोलिसांनी शोध घेऊन अपहरणकर्त्या देवानंद शर्मा (४५) या सुरक्षा रक्षकाला सोमवारी पहाटेच्या सुमारास कल्याणच्या विठ्ठलवाडी भागातून अटक केली. त्याला दोन दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे.
हा मुलगा रविवारी सकाळी घोडबंदर रोड येथील ‘जांगिड’ या इमारतीसमोरून सकाळी १० वाजण्याच्या सुमारास खेळताना अचानक बेपत्ता झाला. दोन तास उलटूनही तो घरी न परतल्याने त्याच्या पालकांनी सर्वत्र शोध घेतला. अखेर, रात्री याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात त्याच्या अपहरणाची तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होत असतानाच त्याचा मोबाइल देवानंद शर्मा याच्याकडे लागल्याचे आढळले. त्याला दोन तासांत घेऊन येतो, असे शर्माने सांगितले. तो न आल्याने अखेर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय ढोले आणि पोलीस निरीक्षक नासीर कुलकर्णी यांनी सहायक पोलीस निरीक्षक कैलास टोकले, हवालदार विश्वनाथ दुर्वे, राजकुमार महापुरे, राजेंद्र चौधरी आणि विजय जाधव यांची पथके तयार केली. विठ्ठलवाडी परिसरात या पथकांनी रविवारी रात्री शोध घेतला. अनेक बांधकामांच्या ठिकाणी शोध घेतल्यानंतर एका बंद खोलीतून देवानंदला या पथकांनी ताब्यात घेतले आणि त्याच्या ताब्यातून या मुलाची सुखरूप सुटकाही केली. या मुलाला आपण सहजच फिरण्यासाठी घेऊन गेलो होतो, पण येताना पैसे नसल्याने त्याला आणू शकलो नसल्याचा दावा त्याने पोलिसांकडे केला. देवानंद हा पूर्वी ठाण्यातील ‘जांगिड’ इमारतीमध्ये सुरक्षारक्षकाचे काम करत होता. त्यामुळेच त्याची या मुलाशी ओळख झाली होती. सकाळी त्याने त्याला वाघबीळ येथे फिरण्याच्या बहाण्याने नेले. पण वाघबीळला जाण्याऐवजी बसने तो ठाणे रेल्वेस्थानक येथे गेला. तिथून रेल्वेने त्याने विठ्ठलवाडी गाठले. तेथील एका बांधकामाच्या ठिकाणी मुलाला त्याने एका खोलीत डांबून ठेवले. मुलाने घरी फोन केल्यानंतर दोन तासांत घेऊन येतो, असे त्याने सांगितले. पण नंतर देवानंदने स्वत:चाही फोन बंद करून ठेवला. घरी फोन केल्यास ठार मारण्याची धमकीही त्याने मुलाला दिली. पोलिसांनी मुलाच्या मोबाइलच्या आधारावर विठ्ठलवाडी परिसरातून त्याची सुखरूप सुटका केल्याने त्याच्या पालकांनी पोलिसांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.