आत्महत्येच्या प्रयत्नातील वृद्धेचे ठाणे पोलिसांनी वाचविले प्राण
By जितेंद्र कालेकर | Published: November 8, 2021 11:51 PM2021-11-08T23:51:12+5:302021-11-08T23:56:41+5:30
पोलीस कर्मचाऱ्यांनी सोसायटीतील काही महिलांची मदत घेऊन तिला सुखरूप बाहेर काढले. तसेच आत्महत्या करण्यापासून तिचे मनही परिवर्तन केल्याने पोलीस कर्मचाºयांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, सहायक पोलीस आयुक्त सोनाली ढोले आणि उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी कौतुक करून अभिनंदन केले.
जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कौटुंबिक कलहामुळे इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या वैशाली ढोळ (६५) या वृद्धेचे मन परिवर्तन करण्यात नौपाडा पोलिसांना सोमवारी यश आले. पोलिसांनी अवघ्या तीन मिनिटांमध्ये घटनास्थळी धाव घेतल्याने तिचे प्राण वाचू शकल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली.
नौपाडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात बीट मार्शल एक आणि दोनचे पोलीस नाईक सूरज कोटकर, जानराव तायडे, ईश्वर घोलवड आणि पोलीस कॉन्स्टेबल राहुल जाधव हे सोमवारी सकाळी गस्त घालीत होते. त्याचवेळी बीट मार्शल दोन यांच्या बिनतारी संदेश यंत्रणेवर सकाळी ७.२३ मिनिटांनी वैशाली ढोळ ही महिला आत्महत्या करीत असल्याचा कॉल कचराळी तलावाच्या बाजूला असलेल्या ‘पूर्वा’ या सोसायटीतून प्राप्त झाला. ही माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता बिट मार्शल एक आणि दोन यांनी या कॉलची तत्काळ दखल घेऊन अवघ्या तीन मिनिटांमध्ये घटनास्थळी धाव घेतली. आपल्याच सदनिकेतून खाली उडी घेऊन आत्महत्येच्या प्रयत्नात असलेली ही महिला तिच्याच सदनिकेच्या खिडकीत अडकली होती. घटनास्थळी पोहोचलेल्या या पोलीस कर्मचाऱ्यांनी सोसायटीतील काही महिलांची मदत घेऊन तिला सुखरूप बाहेर काढले. तसेच आत्महत्या करण्यापासून तिचे मनही परिवर्तन केल्याने पोलीस कर्मचाºयांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, सहायक पोलीस आयुक्त सोनाली ढोले आणि उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी कौतुक करून अभिनंदन केले.