राजस्थानमधून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलासह मुलीचा ठाणे पोलिसांनी घेतला शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 11:15 PM2019-09-20T23:15:39+5:302019-09-20T23:20:34+5:30
राजस्थानातून अपहरण झालेल्या मुलीसह अल्पवयीन मुलगाही ठाण्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने त्यांना ठाण्याच्या सिडको बस थांबा येथून ताब्यात घेतले. आता या दोघांनाही राजस्थान येथील त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ठाणे : राजस्थानमधून अपहरण झालेल्या एका सोळावर्षीय मुलीचा आणि अठरा वर्षीय मुलाचा ठाणे पोलिसांनी शोध घेतला असून, त्यांना त्यांच्या पालकांकडे गुरुवारी सोपवण्यात आले. गेल्या चार दिवसांमध्ये अशा तीन मुलांचा शोध घेण्यात यश आल्याने पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी या पथकाचे विशेष कौतुक केले आहे.
राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातील कोटा शहर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील बोरखेडा येथील पोलीस ठाण्यात आदित्य शंकरलाल मिणा (१८) आणि एका सोळावर्षीय मुलीच्या अपहरणाचा गुन्हा २०१८ मध्ये दाखल करण्यात आला होता. ही मुले ठाण्यात असल्याची माहिती राजस्थान पोलिसांकडून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यासाठी राजस्थान येथील पोलीस उपनिरीक्षक चंपालाल जांगीड हे त्यांच्या पथकासह ठाण्यात दाखल झाले होते. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, उपनिरीक्षक कैलास सोनवणे, पोलीस हवालदार प्रकाश कदम, चंद्रकांत वाळुंज, नीलम पाचपुते आणि वसंत शेडगे आदींचे पथक राजस्थान पोलिसांसमवेत मदतीसाठी नेमण्यात आले. ही दोन्ही मुले ठाण्याच्या सिडको बसथांब्यावर येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ठाणे पोलिसांनी त्यांना १८ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. हे दोघेही राजस्थानातील बोरखेडा बजरंग विहार येथून बेपत्ता झाल्याचे चौकशीत समोर आले. गेल्या १५ महिन्यांपासून ते ठाणे आणि मुंबई परिसरांत वास्तव्य करीत होते. त्यांना इकडे कोणी आणले, त्यासाठी कोणी फूस लावली, या सर्व बाबींचा आता राजस्थान पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, या दोघांनाही राजस्थान पोलिसांच्या मदतीने त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. दोनच दिवसांपूर्वी दिल्ली येथील एका सोळावर्षीय मुलीचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने कल्याण येथून शोध घेतला होता.