ठाणे स्थानकात चोरटे सुसाट : लोकलमधील मोबाइलचोरीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 02:42 AM2019-01-12T02:42:18+5:302019-01-12T02:42:34+5:30
ठाणे स्थानकात चोरटे सुसाट : वर्षभरात अवघे २४६ गुन्हे उघडकीस, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची होते मदत
ठाणे : लोकल प्रवासात मोबाइलचोरट्यांची जणू बुलेट ट्रेन सुसाटच असल्याचे ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या आकडेवारीवरून स्पष्ट दिसत आहे. २०१७ पेक्षा २०१८ या वर्षभरात लोकलमध्ये चोरीला गेलेल्या मोबाइलचे प्रमाण एक हजार २९ ने वाढले असून उघडकीचे प्रमाण जवळपास ४३ ने घटले आहे. मात्र, गतवर्षापेक्षा या वर्षात पकडलेल्या आरोपींची संख्या सुमारे १२५ ने वाढली असून ही जमेची बाजू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसागणित लोकल प्रवासात मोबाइलचोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन रेल्वे पोलिसांनी पेट्रोलिंगवर विशेष भर देऊन चोरट्यांवर लक्ष केंद्रित केले. त्यासाठी चोरट्यांची टॉप २५ ची यादी अद्ययावत केली. तसेच स्थानकात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयांचाही उपयोग होऊ लागल्याने चोरट्यांच्या चोरी करण्याच्या काही पद्धती समोर आल्या. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवणे आणखी सोपे झाले होते. परंतु, त्यांनी चोरीच्या प्रकारात बदल केल्याने पुन्हा मोबाइलचे चोरीचे गुन्हे वाढले आहे.
हे प्रकार सर्वाधिक ठाणे रेल्वेस्थानकात वाढल्याचे दिसत आहे. त्यापाठोपाठ मुंब्रा, दिवा आणि कळवा या रेल्वेस्थानकांत मोबाइलचोरीचे प्रकार वाढले आहेत. या घटनांनुसार, दरदिवसाला मोबाइलचोरीचे लोहमार्ग पोलीस ठाण्यात चार ते पाच गुन्हे नोंदवले जात आहेत. याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
चोरटे परराज्यातील तर काही अल्पवयीन
पोलीस कारवाईनंतर तपासात चोरटे अल्पवयीन असल्याचे बºयाच वेळा समोर आले. काही चोरटे कर्नाटक आणि पश्चिम बंगाल यासारख्या परराज्यांतून येऊन फोन चोरी करून तत्काळ पोबारा करत होते. तसेच चोरीला जाणाºया मोबाइलचे लोकेशन्स पाहिल्यास कर्नाटक आणि पश्चिम बंगाल असे आढळत होते. मात्र, दुसºयांदा त्यांचे लोकेशन्स दिसत नव्हते. त्यातच एक किंवा दोन मोबाइल आणण्यासाठी त्या ठिकाणी पोलीस फौज पाठवणेही शक्य नसल्याने हे चोरटे पकडणे पोलिसांसाठी डोकेदुखी होऊन बसले आहेत.
२०१८ मध्ये ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात एकूण चार हजार ७९६ गुन्हे नोंदवले गेले आहे. तर, ४९४ इतके गुन्हे उघडकीस आले असून एकूण ५७७ आरोपींना बेड्या घालण्यात यश आले आहे. या एकूण गुन्ह्यांमध्ये मोबाइलचोरीचे चार हजार ३१ गुन्हे नोंदवले गेले आहेत. त्यापैकी अवघे २४६ गुन्हेच पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. तर, चोरीला गेलेल्या मुद्देमालापैकी पाच टक्के मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एकूण गुन्ह्यांचे प्रमाण जरी वाढले असले, तरी त्यामध्ये मोबाइलचे गुन्हे नोंदवण्यास सुरुवात झाल्यापासून वाढले आहे. त्यामध्ये तीन ते चार टक्के प्रमाण हे सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांचे आहे, अशी माहिती एक वरिष्ठ अधिकाºयाने दिली.
एकूण नोंदवलेल्या
गुन्ह्यांचा तक्ता
वर्ष गुन्हे उघड आरोपी
२०१७ ३४६० ३९२ ४५३
२०१८ ४७९६ ४९४ ५७७
एकूण
मोबाइलच्या
गुन्ह्यांचा तक्ता
वर्ष गुन्हे उघड
२०१७ ३००२ २८९
२०१८ ४०३१ २४६