ठाणे पोलिसांनी उतरवली दोन हजार ७१ तळीरामांची झिंग
By जितेंद्र कालेकर | Published: January 1, 2019 10:33 PM2019-01-01T22:33:12+5:302019-01-01T22:39:35+5:30
मद्य प्राशन करून वाहन चालविणा-या दोन हजार ७१ तळीरामांची झिंग ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी उतरविली. त्यांचे लायसन्स आणि वाहनही जप्तीची कारवाई केली असून, सर्वांचा वाहन परवाना काही काळासाठी निलंबित केला जाणार आहे.
ठाणे : थर्टी फस्टच्या पार्टीसाठी मद्य प्राशन करून वाहन चालविणा-या दोन हजार ७१ तळीरामांची झिंग ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी उतरविली. त्यांचे लायसन्स आणि वाहनही जप्तीची कारवाई केली असून, सर्वांचा वाहन परवाना काही काळासाठी निलंबित केला जाणार आहे. विशेष म्हणजे, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी आणि बड्या कंपन्यांच्या अधिकाºयांवरही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज असलेल्या नागरिकांच्या आनंदात कोणतीही बाधा येऊ नये, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणे शहर आणि ग्रामीण पोलिसांनी मोठा बंदोबस्त मोक्याच्या ठिकाणी तैनात केला होता. मद्य प्राशन करून वाहन चालविणाºयांविरुद्ध ठाणे शहर पोलिसांनी उपायुक्त अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ डिसेंबर रोजी दुपारी ३ ते १ जानेवारी पहाटे ४ वाजेपर्यंत व्यापक मोहीम राबविली. यामध्ये ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या विभागातील १८ युनिट तसेच स्थानिक पोलिसांसह ३०० ते ४०० अधिकारी, कर्मचाºयांनी संपूर्ण रात्रभर कारवाई केली. मद्यप्राशन करून वाहन चालविणाºयांमुळे गंभीर स्वरुपाचे अपघात होऊन अनेकजण जखमी तसेच अनेकांचा मृत्यू होतो. या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षांपासून ठाणे पोलिसांकडून ही कारवाई नववर्षाच्या प्रारंभी केली जाते. यंदा २२ श्वासविश्लेषक यंत्रणेच्या मदतीने ५० प्रमुख नाक्यांवर ही तपासणी झाली. याअंतर्गत काही जणांकडून प्रत्येकी दोन हजार रु पये याप्रमाणे ६२ हजारांचा दंड अनामत रक्कम म्हणून वसूल करण्यात आला. कारवाई केलेल्या इतरांचा चालक परवाना जप्त केला असून त्यांना न्यायालयात दंडाची रक्कम भरावी लागणार असल्याचे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले.
...........................
पॉर्इंन्ट बदलल्यामुळे मासे गळाला
ठाणे शहरासह आयुक्तालयातील ५० ठिकाणी चेक पॉर्इंन्ट्स वारंवार बदलल्यामुळे अनेक मद्यपी चालक पोलिसांच्या जाळ्यात अडकले. यामध्ये राजकीय पक्षांचे पदाधिकारी, मंत्रालय आणि ठाणे महापालिकेतील नोकरदार वर्ग तसेच बड्या कंपन्यांमधील अधिकारीही अडकल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने दिली. पकडल्या गेल्यानंतर संबंधित अधिकारी बड्या राजकीय नेत्याला किंवा इतर बड्या अधिका-यांना फोन लावत होते. पण असे कोणतेही फोन कारवाई करणा-या अधिका-यांनी न घेतल्याने तळीरामांची चांगलीच पंचाईत झाली.
............................
अशी होणार कारवाई
अनेकदा दंड आकारल्यानंतर मद्यपी व्यक्ती न्यायालयात येत नाहीत. त्यात त्यांचा परवानाही निलंबित होत नाही. त्यामुळेच यंदा बहुतांश चालकांकडून दंड आकारण्याऐवजी त्यांची वाहने जप्त केली. यात त्यांना न्यायालयात दोन हजार १०० रुपयांपर्यंत दंडही भरावा लागणार आहे. त्यांचा वाहन चालकपरवाना तीन ते सहा महिन्यांपर्यंत निलंबित केला जाणार असल्याचेही एका अधिका-याने सांगितले.
....................
कुठे झाली कारवाई
ठाणे आयुक्तालयात सर्वाधिक कारवाई कळवा युनिटने २५० जणांवर केली. त्यापाठोपाठ मुंब्रा २००, कल्याण १५० तर डोंबिवली आणि कोळसेवाडी याठिकाणी २००, वागळे इस्टेट १७० आणि ठाणेनगर १५० अशा दोन हजार ७१ जणांवर कारवाई झाली. गेल्या वर्षी १२५० जणांवर अशी कारवाई झाली होती. यंदा ती दुप्पट झाली असून यामध्ये २० ते ३५ वयोगटातील तरुण चालकांचे प्रमाण अधिक असल्याची चिंता पोलिसांनी व्यक्त केली आहे.