अवघ्या चार तासांमध्येच ठाणे पोलिसांनी घेतला सहा वर्षीय मुलीचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 10:27 PM2019-07-01T22:27:21+5:302019-07-01T22:33:28+5:30
ठाण्याच्या मासुंदा तलाव परिसरातून रविवारी अचानक बेपत्ता झालेल्या मुलीचा नौपाडा पोलिसांनी अवघ्या चार तासांमध्येच छडा लावला. आपली नात सुखरुप मिळाल्यामुळे आजोबांनी पोलिसांचे आभार मानले.
ठाणे: मासुंदा तलाव परिसरातून रविवारी अचानक बेपत्ता झालेल्या गौरी शेख या सहा वर्षीय मुलीचा नौपाडा पोलिसांनी अवघ्या चार तासांमध्येच शोध घेतला. ती जांभळी नाका परिसरात मिळाल्यानंतर तिला सुखरुपपणे उस्मान मकबूल शेख (६९) या आजोबांच्या सोमवारी स्वाधीन करण्यात आले.
मासुंदा तलाव येथील भावना हॉटेलसमोरील पदपथावर असलेल्या एका चहाच्या टपरीवर शेख (मुळ रा. मानखेड, जि. लातूर) हे मजूरीचे काम करतात. त्यांची मुलगी क्षयग्रस्त असल्याने तिच्यावर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामुळेच गौरी या नातीसह ते मासुंदा तलाव भागात राहतात. ३० जून २०१९ रोजी सायंकाळी ५ ते ५.३० वा. च्या सुमारास गौरी अचानक बेपत्ता झाली. त्यांनी सर्वत्र शोध घेऊनही ती आढळून आली नाही. अखेर १ जुलै रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास शेख यांनी याबाबत नौपाडा पोलीस ठाण्यात नात हरविल्याची तक्रार दाखल केली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी तात्काळ शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे यांच्या पथकाची या मुलीच्या शोधासाठी निर्मिती केली. मुलीच्या फोटोसह तिच्या आजोबांसमवेत रामचंद्रनगर, लोकमान्यनगर, चरई, खोपट एसटी बस स्थानक तसेच मासुंदा तलाव परिसरातील विविध ठिकाणी पोलिसांनी तिचा शोध घेतला. तसेच या सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजही तपासले. अखेर जांभळी नाका भाजी मार्केट मध्ये गौरी असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. अवघ्या चार तासांमध्येच उपनिरीक्षक कवळे, पोलीस हवालदार सुनिल अहिरे, पोलीस नाईक संजय चव्हाण, पोलीस नाईक सुनिल राठोड आणि पोलीस कॉन्स्टेबल गोरखनाथ राठोड यांनी तिचा शोध घेऊन तिच्यावर प्राथमिक उपचार केले. खेळता खेळता रस्ता विसरल्याने या मार्केटमध्ये झोपून राहिल्याचे तिने महिला पोलिसांना आणि तिच्या आजोबांना सांगितले. आपली नात सुखरुप मिळाल्यामुळे शेख यांनी धुमाळ यांच्या पथकाचे आभार मानले.