Thane: दहीहंडीच्या निमित्ताने ठाकरे आणि शिंदे गटात राजकीय काला
By अजित मांडके | Published: September 6, 2023 06:15 PM2023-09-06T18:15:05+5:302023-09-06T18:15:19+5:30
Thane: दहीहंडीच्या निमित्ताने ठाण्यात ठाकरे आणि शिंदे पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी टेंभीनाक्याच्या दहीहंडी विषयी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.
- अजित मांडके
ठाणे - दहीहंडीच्या निमित्ताने ठाण्यात ठाकरे आणि शिंदे पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी टेंभीनाक्याच्या दहीहंडी विषयी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे. त्यानुसार शिंदे गटाने नौपाडा आणि ठाणेनगर पोलीस ठाण्यात विचारे यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. दुसरीकडे आता ठाकरे गटाने नौपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत विचारे यांचा व्हिडीओ मॉब करुन दाखविण्यात आल्याचा दावा करीत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता शिंदे गट विरुध्द ठाकरे गटात राजकीय काला रंगल्याचे दिसून आले.
ठाण्यातील टेंभीनाका येथे शिंदे गटाकडून दिघे साहेबांची हंडी, ठाण्याची हंडीचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या हंडीचे आयोजन करण्यात येत असते. तर, टेंभीनाका येथून अवघ्या पाच मिनीटांच्या अंतरावरील चिंतामणी चौकात आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आणि ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्यावतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात येते. खासदार राजन विचारे यांनी टेंभीनाका येथील शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या हंडी विषयी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप शिंदे गटाने केला.
मंगळवारी रात्री शिंदे गटाने नौपाडा पोलीस ठाण्यात विचारे यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी यासाठी पोलिसांना निवेदन दिले. तर बुधवारी ठाणेनगर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. शिंदे गट विचारे यांच्यावर कारवाई करण्यासाठी आगेकुच करीत असतांना ठाकरे गटान बुधवारी नौपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत निवेदन सादर केले आहे. या निवेदनात त्यांनी खासदार राजन विचारे यांचा व्हिडीओ मॉब करुन दाखविण्यात आल्याने बदनामी केल्याच्या विरोधात संबधींतावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे. तसेच वायरल होणाºया व्हिडीओची सखोल चौकशी करुन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी युवासेनेचे अधिकारी किरण जाधव यांच्यासह इतर युवासैनिकांनी केली आहे. याशिवाय नौपाडा पोलीस ठाण्याच्या आवारात आणि वरीष्ठ पोलीस निरिक्षकांच्या दालनात घोषणा देणाºयांच्या विरोधातही कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.