ठाण्यात मे अखेरपर्यंत ४० टक्के ऑक्सिजनची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:41 AM2021-05-12T04:41:36+5:302021-05-12T04:41:36+5:30
ठाणे : ठाण्यात पुन्हा काही अंशी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागल्याने येत्या मे अखेरपर्यंत हवेतून तो तयार करून ४० ...
ठाणे : ठाण्यात पुन्हा काही अंशी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागल्याने येत्या मे अखेरपर्यंत हवेतून तो तयार करून ४० टक्के ऑक्सिजनची कमतरता भरून काढणार असल्याचा दावा महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी मंगळवारी केला.
महापालिकेच्या तीन कोविड सेंटरला सध्या दिवसाला ६२ मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे. परंतु ४७ मेट्रिक ऑक्सिजन उपलब्ध आहे. तर महापालिकेच्या माध्यमातून सध्या ३.२ मेट्रिक टन निर्मिती केली जात आहे. परंतु, मे अखेर ती वाढवून १५ मेट्रिक टन ऑक्सिजन तयार होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तर सध्या असलेल्या तीन सेंटरच्या ठिकाणी आणखी ३६ मेट्रिक टनचे टॅंक उभारले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ग्लोबल, पार्किंग प्लाझा आणि व्होल्टास येथे तीन कोविड सेंटर चालविली जात आहे. व्होल्टास येथील कोविड सेंटर आता लवकरच सुरू केले जाणार आहे. सध्या महापालिकेला लिक्विड मेडिकल ऑक्सिजन या तीनही ठिकाणी सध्या प्रत्येकी १२ मेट्रिक टन ऑक्सिजनचे टॅंक उपलब्ध आहेत. तर आता येत्या मे अखेर या तीनही ठिकाणी अतिरिक्त १२ मेट्रिक टनचे टॅंक उभारणार असल्याची माहितीदेखील आयुक्तांनी दिली. त्यामुळे एखाद्या वेळेस ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकला नाही, तर यातील हे १२ मेट्रिक टनाचे टॅंक पुढील २४ तासासाठी कामाला येऊ शकणार आहेत.
सध्या महापालिकेच्या माध्यमातून पार्किंग प्लाझा येथे हवेतून ऑक्सिजन तयार करण्याचा प्लान्ट उभारला आहे, त्यातून दिवसाला ३.२ मेट्रिक टन निर्मिती होत आहे. हा ऑक्सिजन येथील ३५० बेडसाठी पुरत आहे. त्यामुळे या ३५० बेडसाठी लिक्विड मेडिकल ऑक्सिजन वापरले जात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शिल्लक मेडिकल ऑक्सिजन हे व्हेंटिलेटर आणि आयसीयूसाठी वापरले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तर हेच हवेतून निर्माण होणारे ऑक्सिजन व्हेंटिलेटर किंवा आयसीयूसाठी वापरले गेले तर तर ६० बेडसाठीच ते वापरले जाऊ शकणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी लिक्वीड मेडिकल ऑक्सिजनचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
मे अखेर १५ मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती
सध्या पार्किंग प्लाझा येथे ३.२ मेट्रिक टन हवेतून ऑक्सिजनची निर्मिती होत आहे. परंतु, आता येथील क्षमता आणखी दोन मेट्रिक टनने वाढवून ती ५.२ मेट्रिक टन करण्यात येणार आहे. तर ग्लोबल रुग्णालय आणि व्होल्टास येथे देखील प्रत्येकी ५ मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे मे अखेर १५ मेट्रिक निर्माण होणार असून ठाणे ही देशातील ४० टक्के ऑक्सिजन निर्माण करणारी पहिली महापालिका ठरणार असल्याचा दावा आयुक्तांनी व्यक्त केला.