ठाणे स्थानकाचा विस्तार झाला सुकर, मंत्रिमंडळाची मोहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 03:57 AM2018-07-06T03:57:41+5:302018-07-06T03:57:50+5:30
गेली अनेक वर्षे मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या विस्तारित ठाणे स्थानक प्रकल्पासाठी आरोग्य विभागाच्या अखत्यारितील मनोरु ग्णालयालगतची जागा देण्यास राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी मंजुरी दिली.
ठाणे : गेली अनेक वर्षे मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या विस्तारित ठाणे स्थानक प्रकल्पासाठी आरोग्य विभागाच्या अखत्यारितील मनोरु ग्णालयालगतची जागा देण्यास राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी मंजुरी दिली. याबदल्यात आरोग्य विभागाला टीडीआर मिळणार असून त्याद्वारे मनोरुग्णालयाचा पुनर्विकास करण्यात येणार आहे.
यासंदर्भात पुढील कार्यवाहीसाठी अर्थ विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, नगरविकासचे प्रधान सचिव, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव आणि ठाणे महापालिका आयुक्तांची समिती स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत या ठिकाणी विस्तारित ठाणे स्थानकाची उभारणी केली जाणार आहे. ठाणे रेल्वेस्थानक आणि परिसरातील वाहतूककोंडीवर उपाय म्हणून गेली अनेक वर्षे ठाणे आणि मुलुंड यांच्यादरम्यान मनोरु ग्णालयालगतच्या जागेवर विस्तारित ठाणे स्थानक बांधण्याची मागणी होत होती. दीडशे वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या ठाणे स्थानकाची क्षमता संपली असून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असल्यामुळे दुर्घटना घडण्याची भीतीही व्यक्त होेत होती.
या प्रकल्पासाठी आरोग्य विभागाची जागा मिळणे, हा सर्वात महत्त्वाचा टप्पा होता. गुरुवारी मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाबद्दल एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि डॉ. दीपक सावंत यांचे आभार मानले आहेत.
महापालिकेच्या पाठपुराव्याला यश
महापालिकेच्या पाठपुराव्यानंतर रेल्वेने हा प्रकल्प करण्यास मान्यता दिल्यानंतरही ती जागा आरोग्य विभागाच्या मालकीची असल्यामुळे आजवर हा प्रकल्प पुढे सरकला नव्हता. परंतु, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने गेल्या चार वर्षांमध्ये अनेक अडचणी दूर करण्यात यश आले.
ठाण्याचे खासदार राजन विचारे यांचाही सातत्याने पाठपुरावा
सुरू होता. तसेच, ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनीही पुढाकार घेऊन महापालिकेच्या माध्यमातून अनेक सकारात्मक निर्णय घेतल्यामुळे प्रकल्प पुढे सरकण्यास मदत झाली असल्याचे बोलले जात आहे.