स्वच्छतेत 'ठाणे रेल्वे स्थानक' ठरले बेस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 05:03 PM2019-04-17T17:03:59+5:302019-04-17T17:05:39+5:30
भारतीय रेल्वेच्या 166 व्या वर्धापन दिनी हा पुरस्कार मिळाल्याने ठाणे रेल्वेस्थानकातील स्वच्छता राखण्याची जबाबदारी आणखी वाढली आहे.
ठाणे - मध्य रेल्वेवरील मुंबई विभागात ठाणेरेल्वेस्थानकाला यंदाचा स्वच्छतेचा ‘बेस्ट रेल्वेस्टेशनचा पुरस्कार’ मिळाला आहे. ठाणे हे एकमेव रेल्वेस्टेशन ए-1 या श्रेणीत होते. तसेच ठाण्यातील उपप्रबंधक आणि काटेवाला अशा दोघांना वैयक्तिक उत्कृष्ट सेवेबद्दल डीआरएम असे पुरस्कार मिळाले आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी उत्कृष्ट स्वच्छतेसाठी ठाण्याला 2004 साली पुरस्कार मिळाला होता. भारतीय रेल्वेच्या 166 व्या वर्धापन दिनी हा पुरस्कार मिळाल्याने ठाणे रेल्वेस्थानकातील स्वच्छता राखण्याची जबाबदारी आणखी वाढली आहे.
मध्य रेल्वेच्या वतीने सीएसएमटी येथे 64 वा सप्ताह आयोजित केला होता. या कार्यक्रमांतर्गत मुंबई विभागात येणाऱ्या रेल्वेस्थानकांना मंगळवारी विविध श्रेणींमध्ये पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यामध्ये ठाणे स्टेशनला बेस्ट स्टेशनचा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार ठाणो रेल्वेस्थानकाचे उपप्रबंधक रवी नांदूरकर यांनी मध्य रेल्वेचे डीआरएम संजयकुमार जैन यांच्या हस्ते, तर एडीआरएम विद्याधर माळेगावकर, पीयूष ककड, आशुतोष गुप्ता आदी मान्यवरांच्या उपस्थितीत स्वीकारला. शिल्ड आणि रोख दोन हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच ठाण्याच्या उपप्रबंधक अपर्णा देवधर आणि काटेवाला मनीषा पाटले यांना उत्कृष्ट सेवेबद्दल उत्कृष्ट डीआरएम हा पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
‘‘विविध श्रेणींत स्टेशन परिसरातील स्वच्छतेबाबत पुरस्कार देऊन गौरवले आहे. यामध्ये ठाणे रेल्वेस्थानकाला ए-1 श्रेणीत बेस्ट स्टेशन पुरस्कार मिळाला आहे. यापूर्वी ठाण्याला 2004 मध्ये हा पुरस्कार मिळाला होता.’’- राजेंद्र वर्मा, डायरेक्टर, ठाणे रेल्वेस्थानक