रात्रीच्या चोरसरींनी धुतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 06:46 AM2018-06-10T06:46:25+5:302018-06-10T06:46:25+5:30

शुक्रवारी मध्यरात्री ठाणेकर गाढ साखरझोपेत असताना चोरपावलाने आलेल्या मान्सूनने त्यांना अक्षरश: धुऊन टाकले. ठाणे रेल्वेस्थानकात रुळांवर पाणी साचल्याने रेल्वे तसेच शहरांत ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने महापालिकांच्या नाले व गटारसफाईची पोलखोल झाली.

 thane Rain News | रात्रीच्या चोरसरींनी धुतले

रात्रीच्या चोरसरींनी धुतले

Next

ठाणे -  शुक्रवारी मध्यरात्री ठाणेकर गाढ साखरझोपेत असताना चोरपावलाने आलेल्या मान्सूनने त्यांना अक्षरश: धुऊन टाकले. ठाणे रेल्वेस्थानकात रुळांवर पाणी साचल्याने रेल्वे तसेच शहरांत ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने महापालिकांच्या नाले व गटारसफाईची पोलखोल झाली. दुपारनंतर पुन्हा पावसाच्या सरींना सुरुवात झाल्याने गेले काही दिवस उकाड्याने अक्षरश: हैराण झालेले ठाणेकर सुखावले.
पहिल्याच पावसात जिल्ह्यातील भार्इंदर, ठाणे व भिवंडी येथे विविध घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला, तर सातजण जखमी झाले. शुक्रवारी मध्यरात्री अचानक आल्हाददायक वारे वाहू लागले, विजा चमकू लागल्या आणि पावसाच्या टपोऱ्या थेंबांची तडतड सुरू झाली. सकाळी पावसाचा जोर ओसरला होता. मात्र, दुपारनंतर पुन्हा सरींना सुरुवात झाली.
शुक्रवारी दिवसभरात ठाणे शहरात २३५ मिमी पाऊस झाला, तर जिल्ह्यात मागील २४ तासांत ठाण्यासह ४०५ मिमी पाऊस पडला. यामध्ये सर्वाधिक पाऊस भिवंडी शहरात २१० मिमी नोंदला गेला. कल्याणमध्ये ४३ मिमी, मुरबाड १२ मिमी, उल्हासनगर २२ मिमी, शहापूर २५ मिमी, तर सर्वात कमी अंबरनाथला ९.२० मिमी पावसाची नोंद झाली. २४ तासांच्या कालावधीत ठाणे शहरात ४२ झाडे उन्मळून पडली. पाचपाखाडीसह शहरात सुमारे १८ ठिकाणी पाणी साचले. मुंब्रा येथील चाँदनगर, कौसा, अमृतनगर परिसरांतील सखल भागांत, दुकानांत पाणी शिरल्याने रमजानच्या महिन्यात लोकांचे हाल झाले असून एका नाल्याची भिंत पडली.

ठाण्यात खड्ड्यांचा पहिला बळी
पहिल्याच पावसात घोडबंदर रोडवरील नागलाबंदर भागात खड्डा चुकवताना आपल्या दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने प्रियंका झेंडे (२२, रा. लोकमान्यनगर, ठाणे) या तरुणीचा मृत्यू झाला. तर, तिची मैत्रीण तन्वी वसंत बोलाडे (२२, रा. यशोधननगर, ठाणे) ही जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. महापालिकेने शहरातील रस्त्यांची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती केल्याचा दावा फोल ठरला. या तरुणीच्या मृत्यूस पालिकेचे अभियांत्रिकी खाते जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. अपघाती मृत्यूची कासारवडवली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पावसामुळे मंदावला मध्य रेल्वेचा वेग

डोंबिवली : ठाणे, कल्याण-डोंबिवली तसेच जिल्ह्यात अनेक ठिकाणी शनिवारी मध्यरात्रीनंतर २ ते सकाळी ६ वाजेपर्यंत वादळीवाºयासह पावसाने हजेरी लावली. यामुळे पहाटेपासून कसाºयाच्या दिशेने जाणाºया लांब पल्ल्यांच्या गाड्या आणि उपनगरी लोकलचा वेग मंदावला. तसेच काही लोकल ठाणे स्थानकात रद्द केल्याने प्रवाशांचे हाल झाले. या गोंधळामुळे मध्य रेल्वे ४० मिनिटे विलंबाने धावत होती. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले.
मुंबईत पावसाचा जोर वाढल्याने कुर्ला-सायन भागात रेल्वे रुळांमध्ये पाणी साचले. त्यामुळे ठाणे, दिव्यादरम्यान लोकलच्या रांगा लागल्या. कल्याण-ठाणे धीम्या लोकल प्रवासाला एरव्ही २५ मिनिटे, तर जलद लोकलला १८ मिनिटे लागतात, पण शनिवारच्या गोंधळामुळे सकाळी अर्धा ते पाऊण तास लागला. वेळापत्रक कोलमडल्याने ठाणे स्थानकात काही लोकल रद्द करण्यात आल्या. त्यामुळे ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर तसेच टिटवाळा, आसनगाव स्थानकांत प्रवाशांची गर्दी झाली होती.
सायन-कुर्लादरम्यान पाणी साचल्याने मुंबई-दादरहून निघालेल्या लोकल डाउनमार्गे कासवगतीने धावल्या. घाटकोपर-ठाण्यापर्यंत गाड्यांचा वेग मंदावलेला होता. ठाणे स्थानकातून दुपारी ३ ते ४ दरम्यान केवळ धीम्या मार्गावरील फलाट क्रमांक ४ वरूनच मुंबईच्या दिशेने गाड्या धावल्या. फलाट क्रमांक १ वरून मुंबईसाठी लोकल सोडल्याच नाहीत, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी जितेंद्र विशे या प्रवाशाने दिली. लोकल गाड्या रद्द होणे, वेग मंदावणे यामुळे दुपारनंतर घरी परतणाºया चाकरमान्यांमुळे गाड्यांना प्रचंड गर्दी झाली होती.

वर्तकनगरातील
३३० कुटुंबांचे स्थलांतर
१ वर्तकनगर पोलीस वसाहतीमधील सात अतिधोकादायक इमारतींमधील ३३० कुटुंबांचे घोडबंदर भागातील भार्इंदरपाडा येथील लोढा स्प्लेंडोरा गृहसंकुलात तत्काळ स्थलांतर करण्याचे आदेश महापालिकेने दिले. महापालिका हद्दीत पावसाळ्यापूर्वी दरवर्षी धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा सर्व्हे केला जातो.
२अतिधोकादायक इमारती रिकाम्या करून त्या तत्काळ तोडण्याची कारवाई पालिकेकडून केली जात आहे. पालिकेच्या सर्व्हेत वर्तकनगर येथील पोलीस वसाहतीमधील या इमारतींचा समावेश होता. शुक्रवारी मध्यरात्रीपासून पाऊस सुरू होताच शनिवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्वत: या भागाची पाहणी केली.
३या वसाहतीमधील ५८, ५९, ६० आणि ६१ या सात इमारतींमधील ३३० कुटुंबांना हलवण्याचे आदेश दिले. या कुटुंबांना स्थलांतरित करण्यासाठी महापालिकेच्या वतीने मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री पुरवण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले. येथील रहिवाशांच्या मागण्यांचा विचार होईल, असे आयुक्त म्हणाले.

Web Title:  thane Rain News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.