ठाण्यात पावसाचा एक बळी; ३१६ मिमी पावसाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 12:14 AM2018-07-04T00:14:15+5:302018-07-04T00:14:25+5:30
दोन दिवसांच्या कडकडीत उन्हानंतर जिल्ह्यात पावसाला जोरदार सुरुवात झाली. या पावसादरम्यान ठाणे शहरात पातलीपाडा येथे भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले.
ठाणे : दोन दिवसांच्या कडकडीत उन्हानंतर जिल्ह्यात पावसाला जोरदार सुरुवात झाली. या पावसादरम्यान ठाणे शहरात पातलीपाडा येथे भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले. प्रकाश वाळवे (३५) असे यातील मृताचे नाव असून भारती वाळवे (२९) या गंभीर जखमी झाल्या आहेत. समय जाधव हा १० वर्षीय मुलगादेखील जखमी झाला. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्यामुळे वाहतूककोंडी झाली.
सर्वत्र पडलेल्या या पावसामुळे जिल्ह्यातील बळीराजा सुखावला आहे.
जिल्ह्यात मागील २४ तासांच्या कालावधीत ३१६ मिमी पाऊस पडला आहे. जिल्हा प्रशासनाने या पावसाची नोंद घेतली असून ती सरासरी ४५.१४ मिमी. अशी आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ७२३.३० मिमी. पाऊस पडला आहे.
मागील वर्षी जुलै महिन्यापर्यंत सरासरी ९७० मिमी पाऊस पडला होता. तुलनात्मकदृष्ट्या आतापर्यंत सरासरी २४६.७६ मिमी. पाऊस जिल्ह्यात कमी पडला आहे.
या काळात भातसा धरणात ३५२ मिमी सर्वाधिक पाऊस पडला आहे. तर बारवीत केवळ ७६.५३ मिमी, तानसात ३७, मोडकसागरमध्ये ६८, आध्रांत ८९.३५ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
मात्र, मध्यरात्री मुंबईत मुसळधार पडलेल्या पावसामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक मंगळवारी दिवसभर कोलमडले होते. ट्रॅकवर पाणी साचल्याने रेल्वेही २० ते २५ मिनिटे उशिराने धावत होत्या. यामुळे ठाणे, कल्याण - डोेंबिवलीसह कर्जत, कसारा, नवी मुंबई आदी परिसरातील चाकरमान्यांचे हाल झाले.