Thane: राजावाडी क्रिकेट क्लबला विजेतेपद, अर्जुन मढवी स्मृतीचषक महिला टी २० लीग क्रिकेट स्पर्धा
By प्रज्ञा म्हात्रे | Published: December 23, 2023 04:33 PM2023-12-23T16:33:33+5:302023-12-23T16:34:20+5:30
Thane News: राजावाडी क्रिकेट क्लबने पदार्पणालाच अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या रिगल क्रिकेट क्लबचा चार धावांनी पराभव करत डॉ राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिशन आणि दैवेज्ञ क्रिकेट क्लब आयोजित चौथ्या अर्जुन मढवी स्मृतिचषक महिला टी २० लीग क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले.
- प्रज्ञा म्हात्रे
ठाणे - राजावाडी क्रिकेट क्लबने पदार्पणालाच अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या रिगल क्रिकेट क्लबचा चार धावांनी पराभव करत डॉ राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिशन आणि दैवेज्ञ क्रिकेट क्लब आयोजित चौथ्या अर्जुन मढवी स्मृतिचषक महिला टी २० लीग क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले. राजावाडी क्रिकेट क्लबने १४५ धावांचा पाठलाग करणाऱ्या रिगल क्रिकेट क्लबला १४१ धावांवर रोखत अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केले. निर्णायक लढतीत ५९ धावांची खेळी करत सामन्याला कलाटणी देणारा अप्रतिम झेल पकडणाऱ्या विजेत्या संघाच्या सलोनी कुष्टेला अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हूणन सन्मानित करण्यात आले.
रिगल क्रिकेट क्लबची कर्णधार हर्षल जाधवने नाणेफेक जिंकल्यावर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. हर्षलचा हा निर्णय चुकीचा ठरवताना सोनाली आणि राजावाडी संघाची कर्णधार शेरील रोझारिओने तिसऱ्या विकेटसाठी ९४ धावांची भागिदारी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. सलोनीने ५४ चेंडूत आठ चौकारासह ५९ धावा केल्या. तर शेरिलने कर्णधाराला साजेशी खेळी करताना ४२ चेंडूत आठ चौकार मारत नाबाद ५८ धावा केल्या. चेतना बिश्त आणि हर्षल जाधवने प्रत्येकी एक विकेट मिळवली. या आव्हानाचा पाठलाग करताना शृष्टी नाईक आणि पूनम खेमनारने तिसऱ्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी करत रिगल संघाला विजयाची आस दाखवली. पण पूनम बाद झाल्यावर रिगल संघाच्या धावांचा ओघ मंद झाला.
पूनमने ४३ आणि शृष्टीने ४१ धावा केल्या.त्यानंतर मोनिका तिवारीने दमदार फलंदाजी करत पुन्हा एकदा संघाला विजय दृष्टीक्षेपात आणून दिला. षटकार ठोकण्याच्या प्रयत्नात मोनिकाच्या उत्तुंग फटक्याचे झेलात रूपांतर करून सलोनीने रिगल संघाच्या विजयाच्या आशा संपुष्ठात आणल्या. मोनिकाने २० धावा केल्या. निविया आंबरेने प्रतिस्पर्ध्याच्या महत्वाच्या चार फलंदाजाना बाद करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. स्पर्धेतील विजेत्यांना भारताच्या पहिल्या कसोटी महिला पंच वृंदा राठी, मुंबई क्रिकेट संघटनेचे सहसचिव दीपक पाटील, मुंबई क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी कौशिक गोडबोले, मंगेश यादव, प्रमोद यादव, मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवड समिती सदस्या श्रद्धा चव्हाण, स्पर्धेचे प्रमुख संयोजक डॉ राजेश मढवी, माजी नगरसेविका प्रतिभा मढवी, मनविसेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.
स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू :
सर्वोत्तम फलंदाज : सृष्टी नाईक (रिगल क्रिकेट क्लब),
सर्वोत्तम गोलंदाज : कोमल जाधव (रिगल क्रिकेट क्लब).
सर्वोत्तम क्षेत्ररक्षक : ख़ुशी गिरी
स्पर्धेतील सर्वोत्तम : हर्षल जाधव ( रिगल क्रिकेट क्लब)
अंतिम सामन्यातील सर्वोत्तम : सलोनी कुष्टे (राजावाडी क्रिकेट क्लब).