क्लायमेट सिटीत ठाणे देशात दुसऱ्या क्रमांकावर; सकारात्मक वातावरण बदलासाठी प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 03:00 AM2020-01-26T03:00:34+5:302020-01-26T03:00:47+5:30
मागील काही वर्षांत हवेची गुणवत्ता राखण्यात पालिकेला यश आले आहे.
ठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या एनर्जी आणि ग्रीन बिल्डिंग, अर्बन प्लानिंग, ग्रीन कव्हर, बायोडायव्हर्सिटी, ट्रान्सपोर्ट आणि हवा गुणवत्ता तसेच पाण्याचे नियोजन आणि वेस्ट मॅनेजमेंटवर केलेले विविध प्रयोग या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून राबविलेल्या या योजनांमुळे ठाणे शहराने स्मार्ट सिटी क्लायमेटमध्ये अर्थात वातावरणातील सकारात्मक बदलासाठी सक्षम असलेल्या शहरांमध्ये देशातून दुसरा क्रमांक पटकावला आहे. यामध्ये पहिला क्रमांक इंदूर या शहराचा लागला असून तिसºया क्रमांकावर सुरत आहे. त्यामुळे ठाण्याच्या मानात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. गेल्या वर्षी ठाणे शहर यात सहाव्या क्रमाकांवर होते. यंदा चार क्रमाकांची आघाडी घेऊन दुसरे स्थान पटकाविले आहे.
दिल्लीमधील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ अर्बन अफेअर्सने घेतलेल्या स्पर्धेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला आहे. यामध्ये ठाणे शहराचा क्रमांकदुसरा आला आहे. या स्पर्धेत देशातील १०० शहरे सहभागी झाली होती. त्यानुसार, विविध माध्यमांतून ठाणे शहराने आपली छाप सोडल्याचे दिसून आले आहे. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून मागील पाच वर्षांत शहराचा ग्रीन कव्हर वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. ठाण्याचा विचार केल्यास शहराचे विकसित क्षेत्र हे ४६ टक्के एवढे आहे, तर २५ टक्के हरित क्षेत्र आहे. पाणीपुरवठ्याचे नियोजनही महापालिकेने राबविले असून स्मार्ट मीटरचा वापर सुरूकेला आहे. तसेच भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पालिकेने रिमॉडेलिंगची योजना पुढे आणली आहे. ऊर्जा कार्यक्षमता आणि नवीनीकरणीय ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून सौरऊर्जेवर निर्माण करणारी यंत्रणा, सौरऊर्जेवर चालणारे सिग्नल, सौरब्लिंकर्स, बायोमिथेनायझेन प्रक्रिया, महापालिका शाळांवर सौरऊर्जेवर वीजनिर्मिती आणि शहरात लावण्यात येत असलेले एलईडी दिवे यामुळेदेखील पालिकेने मागील पाच वर्षांत मेहनत घेतली आहे. तसेच ग्रीन बिल्डिंग संकल्पना राबवून एक वेगळा प्रयत्न सुरू केला आहे. सार्वजनिक वाहतूकव्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न झाले आहेत.
हवेची गुणवत्ता राखण्यात यश
मागील काही वर्षांत हवेची गुणवत्ता राखण्यात पालिकेला यश आले आहे. सण-उत्सवांच्या काळात हवेची गुणवत्ता व्यवस्थित राहावी, यासाठी जनजागृती मोहीम, हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी विविध चौकांत लावलेली यंत्रणा यामुळेदेखील हवेची गुणवत्ता सुधारली आहे. तसेच इतरही योजना राबवून पालिकेने शहरात अर्बन प्लानिंगच्या दिशेने योग्य ती पावले टाकली आहेत. वेस्ट मॅनेजमेंटमध्येही पालिकेच्या माध्यमातून विविध योजना हाती घेतल्या आहेत. या सर्वांची दखल घेतल्यामुळेच ठाणे शहर हे देशात दुसºया क्रमाकांवर आले आहे.