रुग्ण बरे होण्यात ठाणे शहर राज्यात पहिले, तर देशात दुसऱ्या क्रमांकावर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 02:48 AM2020-08-20T02:48:10+5:302020-08-20T02:48:37+5:30
ठाण्यानंतर केडीएमसी अर्थात कल्याण-डोंबिवली दुस-या आणि नवी मुंबई राज्यात तिस-या क्रमांकावर आहे. राजधानी मुंबई राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे.
ठाणे : ठाणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ८९ टक्क्यांवर आले असून राज्याचे हे प्रमाण ७१ टक्के आहे. यामुळे रुग्ण बरे होण्यात ठाणे शहर हे राज्यात पहिल्या, तर देशात दिल्लीनंतर दुसºया क्रमांकावर आले आहे. सध्या ठाण्यात २० हजार ९८९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्यांची संख्या ही १८८५ एवढी आहे. तसेच रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाणही ९० टक्क्यांवर आले आहे. ठाण्यानंतर केडीएमसी अर्थात कल्याण-डोंबिवली दुस-या आणि नवी मुंबई राज्यात तिस-या क्रमांकावर आहे. राजधानी मुंबई राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे.
ठाणे शहरात मार्च महिन्यापासूनच कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत होती. त्यानंतर मे, जूनमध्येही रुग्णांची संख्या दुपटीने वाढली. परंतु, या काळातही ठाणे महापालिकेनेही दोन वेळा लॉकडाऊन जाहीर केल्याने प्रशासनावर विरोधकांनी टीका केली होती. परंतु, आता याचे सकारात्मक परिणाम दिसत असून, शहरात बाधितांची संख्या ही दिवसेंदिवस कमी होत आहे. महापालिका हद्दीत आजपर्यंत २३ हजार ७३२ रुग्ण आढळले आहेत. मंगळवारपर्यंत यातील २० हजार ९८९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
>हे उपाय आले कामी
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाणे महापालिकेने केलेल्या महापालिका हद्दीत कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोविड केअर सेंटर हे १०२४ खाटांचे रुग्णालयही ठाणेकरांसाठी फायदेशीर ठरले आहे.
मुंब्रा, वागळे, लोकमान्यनगर आदींसह इतर भागांत राबविलेल्या पॅटर्नमुळे झोपडपट्टीतील कोरोना रोखण्यात यश आले आहे. देशातील इतर शहरांचा विचार केला किंवा राज्यातील इतर शहरांतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पाहिल्यास देशात दिल्लीचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९० टक्के आहे. यामुळे ठाणे पॅटर्न हा राज्य आणि देशाला आदर्श ठरणार आहे.
पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापालिका प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे ठाणे शहराने कोरोनावर यशस्वी मात करण्यास सुरुवात केली आहे. डॉक्टर, नर्सेस, इतर स्टाफ, शिक्षक आदींसह इतर कर्मचाºयांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच कोरोना रोखण्यात यश आले आहे.
- नरेश म्हस्के, महापौर, ठाणे