डेरवण युथ गेममध्ये ठाण्याला ६१ पदके; २० सुवर्णपदकांचाही समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 12:26 AM2020-03-14T00:26:21+5:302020-03-14T00:26:39+5:30
राज्यस्तरीय स्पर्धा : अचिव्हर्स स्पोर्ट्स क्लबचे यश
ठाणे : श्यामराव विठ्ठल जोशी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित डेरवण युथ गेम २०२० या राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेत ठाण्यातील अचिव्हर्स स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी पदकांची लयलूट करत ठाण्याला २० सुवर्णपदकांसह एकूण ६१ पदके जिंकून दिली आहेत. ही स्पर्धा १० ते १२ मार्चदरम्यान चिपळूण येथे पार पडली. राज्यातील एक हजार खेळाडू यात सहभागी झाले होते.
या स्पर्धेत दहा वर्षांखालील मुलींच्या गटात रिसा फर्नाडिस हिने लांब उडीत रौप्य, तर ५० मीटर स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. १२ वर्षांखालील मुलींच्या गटात वृष्टी सोनांकी हिने २०० मीटर आणि लांब उडी या स्पर्धांमध्ये प्रत्येकी एक रौप्य, १०० मीटर स्पर्धेत कांस्य, तर क्रितीका यादव हिने लांब उडीत कांस्यपदक, वृष्टी, मिहिका, क्रीतिका आणि कन्नान यांनी ४ बाय १०० मीटरच्या मिक्स रिले स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. वृष्टी, मिहिका यांनी ४ बाय १०० मीटर स्पर्धेत सुवर्ण तर कन्नान, क्रीतिका यांनी ४ बाय १०० मीटर स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. १४ वर्षांखालील मुलींच्या गटात निहारिका माधवी हिने ४०० मीटर स्पर्धेत रौप्य आणि २०० मीटर स्पर्धेत कांस्यपदक, त्याचबरोबर निहारिका, वृष्टी, कन्नान आणि मिहिका यांनी ४ बाय १०० मीटर रिलेमध्ये सुवर्णपदक, तर वृष्टी आणि मिहिका या दोघींनी ४ बाय १०० मीटर रिलेमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. १६ वर्षांखालील मुलींच्या गटात अर्पिता गावडे हिने ४०० आणि ८०० मीटर स्पर्धेत प्रत्येकी एक कांस्यपदक जिंकले आहे. त्याचबरोबर ४ बाय १०० मीटर रिलेमध्ये तन्वी, अर्पिता, निहारिका आणि वृष्टी यांनी कांस्यपदक तर तन्वी आणि अर्पिता या दोघींनी ४ बाय १०० मीटर रिलेमध्ये कांस्यपदक जिंकले. १८ वर्षांखालील गटात अदिती परब हिने १०० आणि २०० मीटर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.
सानिकाने १००,२०० मीटरमध्ये रौप्यपदक, ४०० मीटरमध्ये आकांक्षाला रौप्य आणि सिद्धीने कांस्यपदक मिळवले. ४ बाय १०० मीटरमध्ये अदिती, सानिका, सिद्धी, आकांक्षा यांनी रौप्य तर निहारिका, वृष्टी, तन्वी, मिहिकाला कांस्यपदक मिळाले.