ठाण्यात १५१ मिमी पावसाची नोंद, १६ ठिकाणी तुंबले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 01:14 AM2019-06-29T01:14:41+5:302019-06-29T01:14:58+5:30
गेले काही दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने गुरुवारी रात्रीपासूनच ठाणे शहरात दमदार हजेरी लावली.
ठाणे - गेले काही दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने गुरुवारी रात्रीपासूनच ठाणे शहरात दमदार हजेरी लावली. या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला असून शहरातील १६ ठिकाणी पाणी तुंबल्याच्या घटना घडल्या. तर, घोडबंदर भागात वाहतूककोंडी झाल्याचे चित्र होते. गेल्या बारा तासांत शहरात सुमारे १५०.८८ मिमी पावसाची नोंद झाली. शहरात १३ ठिकाणी वृक्ष पडल्याच्या घटना घडल्या. एका घटनेत दोन गाड्यांवर वृक्ष पडले होते. तर, मुंब्य्रात धोकादायक इमारत रिकामी करण्यात आली. दुसरीकडे ठाणे रेल्वेस्थानकात रेल्वे ट्रॅकवरसुद्धा पाणी साचल्याने रेल्वेचा वेग मंदावला होता.
शहरात शुक्र वारी सकाळी पावसाचा जोर वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे सकाळपासूनच रस्त्यावरील वाहतुकीचा वेग मंदावला होता. याचा फटका कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना बसला. सकाळपासून बरसणाºया पावसामुळे ठाणे रेल्वेस्थानकातील फलाट क्र मांक-४ आणि ५ या मुंबईच्या दिशेने जाणाºया ट्रॅकवर पाणी साचले होते. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणाºया गाड्या १० ते १५ मिनिटे उशिरा धावत होत्या.
ठाण्यात दमाणी इस्टेट, बाराबंगला, वाघबीळनाका, कोर्टनाका आदी ठिकाणी वृक्ष पडून गाड्यांचे नुकसान झाले. तर, शहरातील मखमली तलाव, कामगार हॉस्पिटल, जलाराम अपार्टमेंट, साकेत रोड, उथळसर वॉर्ड आॅफिस, माजिवडानाका आदींसह वंदना, राममारुती रोड आदी १६ ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या. मुंब्य्रातील एक धोकादायक इमारत रिकामी करण्यात आली असून लुईसवाडी येथील एक रिकामी इमारत धोकादायक झाल्याने तिच्यावर कारवाई करण्यात आली. सकाळपासूनच सुरू असलेला पाऊस सायंकाळी उशिरापर्यंत कोसळतच होता. गेल्या बारा तासात शहरात १५०. ८८ मिमी पावसाची नोंद झाली. मागील वर्षी २८ जूनपर्यंत १०७५ मिमी पावसाची नोंद झाली होती. यंदा मात्र त्या तुलनेत अगदी कमी पाऊस झाला.