रुग्णांच्या नातेवाईकांकडून ब्रदर्स आणि दिव्यांग कर्मचाऱ्यास मारहाण, ठाणे जिल्हा रुग्णालयात डॉक्टर कर्मचाऱ्यांचे आंदोलन
By अजित मांडके | Published: April 27, 2024 01:58 PM2024-04-27T13:58:21+5:302024-04-27T13:58:51+5:30
Thane News: ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील ब्रदर्स (परिचारक) आणि दिव्यांग कर्मचाऱ्याला शनिवारी पहाटेच्या सुमारास रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण करीत चाकूचा धाक दाखविल्याची घटना घडली. या घटनेचा निषेध करण्यासाठी डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी सकाळी ११ .०० वाजता आंदोलन केले.
- अजित मांडके
ठाणे - ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील ब्रदर्स (परिचारक) आणि दिव्यांग कर्मचाऱ्याला शनिवारी पहाटेच्या सुमारास रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण करीत चाकूचा धाक दाखविल्याची घटना घडली. या घटनेचा निषेध करण्यासाठी डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी सकाळी ११ .०० वाजता आंदोलन केले. या घटनेच्या निमित्ताने पुन्हा एकदा सरकारी रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचार्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शनिवारी पहाटे ४.३० सुमारास वागळे इस्टेट येथील एका व्यक्तीस अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी त्या रुग्णास दाखल करून घेत, त्यावर उपचार सुरू केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर संतापलेल्या ५ ते ६ नातेवाईकांनी तेथे असलेल्या दिव्यांग वॉर्ड बॉय आणि ब्रदरला (परिचारक) मारहाण केली. तसेच चाकूच धाक दाखविला असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. या प्रकारामुळे सर्व कर्मचारी आणि डॉक्टर्स याच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच यावेळी ड्युटी वरील पोलीस हे हजर नव्हते, असे देखील रुग्णालय प्रशासनाने सांगितले. त्यामुळे या घटनेचा निषेध करण्यासाठी शनिवारी सकाळी ११ वाजता डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.