ठाण्यात क्षुल्लक कारणावरून रिक्षाचालकाला केली मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 02:07 AM2020-06-24T02:07:44+5:302020-06-24T02:07:50+5:30
फांदी तोडल्याचा जाब विचारल्याने राऊत यांनीच मारहाण केल्याचा आरोप करीत तुषार आणि राहूल या दोघांनीही त्यांच्याविरुद्ध चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
ठाणे : जंगली झाडाची फांदी तोडल्याच्या रागातून अशोक राऊत (४०, रा. ठाणे) या रिक्षा चालकाला तुषार चौधरी आणि राहूल चौधरी या दोन भावांनी मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली. दरम्यान, फांदी तोडल्याचा जाब विचारल्याने राऊत यांनीच मारहाण केल्याचा आरोप करीत तुषार आणि राहूल या दोघांनीही त्यांच्याविरुद्ध चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
राऊत यांच्या तक्रारीनुसार कोकणीपाडा येथील बुधाजी चौधरी यांच्या जागेतील जंगली झाडाची फांदी त्यांनी सोमवारी सकाळी तोडली. याचा राग आल्याने बुधाजी यांची मुले तुषार आणि राहूल यांनी सिमेंटचा पत्रा आणि दांडक्याने त्यांना मारहाण केली. यात त्यांच्या डोक्यावर आणि हातावर जबर मार लागला. त्यांचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या राऊत यांच्या पत्नीलाही राहूल याने लाकडी दांडक्याने डोक्यावर मारहाण केली. याप्रकरणी त्यांनी तुषार आणि राहूल या दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. राहूल चौधरी (२३, रा. मानपाडा, ठाणे) याने दिलेल्या तक्रारीनुसार राऊत यांनी चौधरी यांच्या जागेतील झाडाची फांदी तोडल्याचा त्यांना तुषारसह दोन्ही भावांनी जाब विचारला. त्यामुळे राग आल्याने त्यांनी लाकडी पट्टीने आणि लादीने दोघांना मारहाण केली. यात दोन्ही भावांना जबर मार लागल्याचे त्यांनी या तक्रारीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक रोकडे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.