ठाणे : रस्ते दुरुस्तीची कामं हाती, एप्रिल महिन्यात शहरात वाहतुकीचे वाजणार तीन तेरा
By अजित मांडके | Published: March 30, 2023 03:53 PM2023-03-30T15:53:52+5:302023-03-30T15:54:11+5:30
पावसाळ्यात खड्डेमुक्त प्रवासासाठी हे प्रयत्न सुरु असल्याचं म्हटलं जातंय.
ठाणे : ठाणे शहरात महापालिका आणि विविध प्राधिकरणांच्या माध्यमातून रस्ते दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागात सध्या वाहतुक कोंडी होतांना दिसत आहे. परंतु आता मुंब्रा बायपास आणि साकेत, खारेगाव पुलावरील दुरुस्तीचे कामही आता हाती घेण्यात येणार आहे. पावसाळ्यात खड्डेमुक्त प्रवासासाठी हे प्रयत्न सुरु आहेत. परंतु आता शहरातील रस्त्यांबरोबर महामार्गावरील रस्त्यांची देखील दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने त्यामुळे शहरात वाहतुक कोंडीत आणखी भर पडणार असल्याचे दिसत आहे. परंतु वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज झाले असून ठाणे, नवी मुंबई महामार्ग पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ५८६ वाहतुक सहाय्यक उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच वाहतुक पोलीसांचे मनुष्यबळही यासाठी कार्यरत असणार आहे.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील विविध भागात रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहे. शहरात ६०५ कोटींची कामे सुरु असून, त्यासाठी अनेक भागात खोदाई केली जात आहे. त्यामुळे शहरातील मध्यवर्ती भागासह अनेक भागात वाहतुकीचा वेग मंदावला आहे. त्यातही माजिवडा, कापुरबावडी, ब्रम्हांड येथील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी येथील काही मार्ग बंद करण्यात आले आहेत. परंतु तरी देखील कापुरबावडी येथे सांयकाळच्या सुमारास वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसत आहे.
दुसरीकडे आता साकेत खारेगाव पुल आणि मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीचे कामही आता हाती घेण्यात आले आहे. मुंब्रा बायपासचे काम १ एप्रिल तर साकेत येथील काम १० एप्रिल पासून सुरु होणार आहे. हे दोनही महामार्ग असल्याने याठिकाणी अवजड वाहनांची रेलचेल असते. पावसाळ्यात याच रस्त्यांवर खड्डे पडून वाहतुकीचा बट्याबोळ झाल्याचे दरवर्षी पहावयास मिळत आहे. त्यामुळे यंदा त्या कोंडी पासून ठाणेकर मुक्त व्हावेत यासाठी ही कामे हाती घेण्यात आली आहेत. परंतु त्याचा फटका आता ३१ मे पर्यंत वाहन चालकांना सहन करावा लागणार आहे.
प्रशासन सज्ज
परंतु वाहतुक कोंडीचा फटका बसू नये यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ५८६ वाहतूक साहाय्यक तैनात असणार आहे. त्यापैकी ठाणे पोलिसांना २४०, नवी मुंबई पोलिसांना २४५ आणि उर्वरित महामार्ग पोलिसांना उपलब्ध केले जाणार आहेत. याशिवाय ठाणे वाहतूक शाखेत सध्या ७०० पोलीस अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे वाहतूक नियंत्रण करण्यास या वाहतूक साहाय्यकांची मदत होणार आहे. तसेच मुख्यालयातूनही सुमारे १०० पोलीस कर्मचारी उपलब्ध असणार आहेत. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात एखादे वाहन बंद पडल्यास या वाहनांना बाजूला करण्यासाठी चार क्रेन, पाच हायड्रा रस्त्याकडेला उभ्या केल्या जाणार आहेत. अवघड वाहन चालकांना वाहतूक बदलाची माहिती मिळावी यासाठी ९२ ठिकाणी दिशादर्शक फलक आणि १० ठिकाणी अधिसूचना फलक बसविले जाणार आहेत.