ठाणे आरटीओचा महसूल आलेख वाढता वाढता वाढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 03:22 AM2018-04-09T03:22:21+5:302018-04-09T03:22:21+5:30
ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाचा महसुलाचा मागील तीन वर्षांचा आलेख पाहता तो वाढतच आहे. त्यातच, २०१७-१८ या वर्षात ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने १३८८ कोटी रुपयांचा महसूल जमा केला आहे.
- पंकज रोडेकर
ठाणे : ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाचा महसुलाचा मागील तीन वर्षांचा आलेख पाहता तो वाढतच आहे. त्यातच, २०१७-१८ या वर्षात ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने १३८८ कोटी रुपयांचा महसूल जमा केला आहे. सर्वाधिक महसूल जमाठाणे उपविभागाने केला असून तो ६२४ कोटी पाच लाख इतका आहे. हा महसूल जीएसटीने लागू झालेल्या दोन टक्के कर आणि त्यातच दुचाकीच्या वाढत्या नोंदणीमुळे उंचावला. राज्यात ठाणे आरटीओने महसूल वसुलीत दुसरा क्रमांक पटकावल्याची माहिती आरटीओ सूत्रांनी दिली.
ठाणे आरटीओ विभागांतर्गत ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत ठाणे, कल्याण, नवीमुंबई आणि वसई असे चार उपविभाग आहेत. त्यानुसार, २०१५-१६ मध्ये ठाणे आरटीओने १०७४.०२ कोटी महसूल जमा केला होता. तर, २०१६-१७ या वर्षी १२४०.३३ तर, २०१७-१८ या वर्षभरात ठाणे आरटीओने १३८८.०२ कोटी महसूल जमा झाला आहे. ११२.८१ वाढलेला महसूल जीएसटीमुळे सरसकट लावलेल्या वाहनखरेदीवरील दोन टक्के करामुळे वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली.
>मुंबईतील वाहनांची नोंदणी मुंबईत
जकातीमुळे मुंबईतील बहुतेक चारचाकी वाहनांची नोंदणी ठाणे आरटीओ विभागात केली जात होती. ती आता जकात बंद झाल्यानंतर जवळपास बंद झाली आहे. त्यामुळे ठाणे आरटीओचे फारसे असे काही नुकसान नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
>२४ कोटींची दंडवसुली
आरटीओच्या सुमारे १५ नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वायुवेग पथकांमार्फत कारवाई केली जाते. वाढलेला महसूल जीएसटीमुळे सरसकट लावलेल्या वाहन खरेदीवरील दोन टक्के करामुळे वाढल्याचे सूत्रांनी सांगितले.यामध्ये ठाणे उपविभागातून १३ कोटी ५५ लाख, कल्याण तीन कोटी ४१ लाख, वसई तीन कोटी ३० लाख आणि नवीमुंबईतून तीन कोटी ५६ लाख दंड आकारला आहे.
>आरटीओचा तीन वर्षांचा महसुली तक्ता
उपविभाग २०१५-१६ २०१६-१७ २०१७-१८
ठाणे ५१६.८२ ५८५.५७ ६२४.०५
कल्याण १५५.८५ २००.११ २५५.८२
वसई १६२.०१ २११.८६ २३९.००
नवीमुंबई २३९.३६ २४२.७९ २६९.१५
एकू ण १०७४.०२ १२४०.३३ १३८८.०२
>आॅनलाइनद्वारे कागदांची बचत
आॅक्टोबर २०१७ पासून आरटीओचा कारभार
आॅनलाइन सुरू झाला. त्यानुसार, ३१ हजार ६९१ जणांनी आॅनलाइनद्वारे ३७ कोटी ७१ हजार रुपये भरले आहेत. तसेच वाहनाच्या निगडित कामासाठी ८१ हजार ८७३ नागरिकांनी अर्ज सादर केले आहेत. त्यामुळे तेवढ्याच पावत्यांसाठी लागणाºया कागदांची बचत झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
>दुचाकींची नोंदणी ७० ते ७२ वाढली
यापूर्वी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत जकातवसुली केली जात होती. मात्र, जकात बंद करून जीएसटी कर लागू करण्यात आला. ही जीएसटी वाहनखरेदी-नोंदणीच्या वेळी आरटीओच्या पथ्यावर पडली आहे. त्यातून आरटीओच्या तिजोरीत सरसकट दोन टक्के करवसुली केल्याने भर पडली आहे. या वर्षात ७० ते ७२ टक्के दुचाकी, १५ ते २० टक्के कारखरेदी झाल्याने त्यांच्याकडून दोन कर वसूल केले आहे. या वाढत्या करापोटीच ठाणे आरटीओचे टार्गेट पूर्ण झाल्याची माहिती ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिली.