प्राणवायूच्या संकलनासाठी ठाणे आरटीओची ‘वायुवेग’ भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:38 AM2021-05-01T04:38:02+5:302021-05-01T04:38:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे: सध्या राज्यभर कोरोना रुग्णांना भासणारा ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी राज्य शासनाकडून विविध स्तरांवर प्रयत्न सुरू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: सध्या राज्यभर कोरोना रुग्णांना भासणारा ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी राज्य शासनाकडून विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. त्यातच अपुरे पडणाऱ्या ऑक्सिजन टँकरच्या संख्येवर मात करण्यासाठी नायट्रोजन आणि ऑरगॉनच्या टँकरचेही ऑक्सिजन टँकरमध्ये रूपांतरित करण्यासाठी तांत्रिक आणि कायदेशीर बाबी पूर्ण केल्या जात आहेत. असे ३१ टँकर ताब्यात घेतल्यानंतर त्यातील चार टँकर गुरुवारी एअर लिफ्टने पाठविण्यासाठी ठाण्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील ३१ अधिकाऱ्यांच्या (आरटीओ) पथकाने वायुवेग कामगिरी बजावली आहे.
सध्या राज्यभर गेल्या काही दिवसांमध्ये वाढलेल्या कोरोनाच्या रुग्णांसाठी ऑक्सिजनची मोठी मागणी आहे. हा पुरवठा करता करता महापालिका आणि राज्य शासनाच्या यंत्रणेची अक्षरश: दमछाक होत आहे. त्यातच ऑक्सिजन तुटवड्याअभावी अनेक रुग्णालयांकडून रुग्णांना अन्यत्र हलविण्याचाही निरोप येतो. काही ठिकाणी तर त्या अभावी रुग्ण दगावल्याच्याही घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने या संपूर्ण देखरेखीसाठी काही भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकाऱ्यांचीही नियुक्ती केली आहे. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड आणि नवी मुंबईतील तुर्भे येथे ऑक्सिजनबरोबरच नायट्रोजन आणि ऑरगॉन वायूची निर्मिती करणाऱ्या दोन खासगी कंपन्या आहेत. या तिन्ही वायूंचा औद्योगिक क्षेत्रासाठी अधिक वापर होतो. सध्या कोरोनामुळे गंभीर रुग्णांना मेडिकल ऑक्सिजनची गरज अधिक वाढली आहे. याची वाहतूक वेळेत व्हावी त्याचबरोबर त्याचे टँकर मोठ्या प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी नायट्रोजनच्या टँकरचे ऑक्सिजन टँकरमध्ये रूपांतरित (कन्वर्जन) करण्यासाठी ते आधी ताब्यात घेण्याचे आदेश अलीकडेच दिले. निव्वळ ऑक्सिजन टँकरची किंमतच ६० लाख ते १ कोटींच्या घरात आहे. त्यामुळे असे नवे टँकर उभे करणे हे यंत्रणेपुढे आव्हान होते. त्यामुळेच रूपांतरित केलेले टँकर ऑक्सिजन निर्मिती कंपन्यांकडे देण्याचेही आदेश देण्यात आले. ठाण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंभर शिंदे आणि जयंत पाटील तसेच कल्याणचे तानाजी चव्हाण यांनी १९ अधिकाऱ्यांची वायूवेग पथके तयार केली. यामध्ये सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी कमलेश चव्हाण, मोटार वाहन निरीक्षक अविनाश काकड, संतोष काथार आणि विजय पिटेकर आदींचा समावेश होता.
खासगी कंपन्यांमध्ये जाऊन असे टँकर मिळविण्यासाठी या अधिकाऱ्यांनी सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य पटवून दिले. त्यांना विश्वासात घेतले. त्यामुळे आधी असे टँकर देण्यास नकार देणाऱ्या कंपन्यांच्या व्यवस्थापनाने आरटीओच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करून तब्बल ३१ नायट्रोजन वायूचे टँकर ऑक्सिजनसाठी दिले. यातील चार टँकर आता २९ एप्रिल रोजी माल वाहतूक करणाऱ्या हवाई दलाच्या खास विमानाने मुंबई येथून भुवनेश्वरला पाठविण्यात आले. तळोजा येथील लिंडेमधून दोन आणि मुरबाडमधील प्रॅक्स एअर कंपनीतून दोन टँकर ऑक्सिजनमध्ये कन्वर्जनसाठी मुरबाडमध्ये ठेवले. त्यानंतर मुरबाड ते ठाणे आणि ठाण्यातून मुंबई विमानतळ येथे हे चार टँकर नेण्यासाठी तानाजी चव्हाण यांच्या पथकाने मेहनत घेतली. याशिवाय, इतरही २७ टँकर हे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये या पथकांनी रवाना केले. कोरोना रुग्णांसाठी आरटीओच्या अधिकाऱ्यांच्या या कार्याबद्दल शासन स्तरावरही विशेष कौतुक होत आहे.
* लॉकडाऊनमध्ये कन्वर्जनचा पार्ट मिळविण्यासाठीही अनेक अडचणी आल्या. त्यावरही या पथकांनी मात केली. दीपक शिंदे या अधिकाऱ्याने स्थानिक पार्टचा वापर करून हे ऑक्सिजन टँकरचे कन्वर्जनही यशस्वी केले. विश्वंभर शिंदे यांनी चाकोरीबाहेर जाऊन काम करून दोन टँकरच्या नोंदणीसाठी विशेष प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
........................................