खुनाचा प्रयत्न करणाऱ्यास अटक : ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेची कारवाई
By जितेंद्र कालेकर | Published: November 12, 2018 10:52 PM2018-11-12T22:52:40+5:302018-11-12T23:00:46+5:30
एका घरात चोरीसाठी शिरल्यानंतर सावध झालेल्या शब्बीर अन्सारी याच्या गळयावर आणि त्याच्या पत्नीवरही वार करुन पसार झालेल्या वडू रेहमान याला अखेर ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने बेडया ठोकल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : चोरीसाठी शिरलेल्या चोरट्याची चाहूल लागताच सावध झालेल्या दाम्पत्यापैकी आधी शब्बीर अन्सारी (४५) यांच्या गळ्यावर आणि नंतर त्यांची पत्नी मोनी (४४) हिच्यावर वार करून पसार झालेल्या वडू रेहमान (२३) या दरोडेखोरास ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नुकतीच अटक केली. त्याला सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
काशिमीरा भागातील कामगारांच्या वस्तीमधील एका झोपडपट्टीमध्ये २७ सप्टेंबर २०१८ रोजी या रेहमानने पहाटे ४ वा.च्या सुमारास शिरकाव केला. कोणीतरी घरात शिरल्याची चाहूल शब्बीर याला लागली. त्या आवाजाच्या दिशेने तो जाण्याच्या तयारीत असतानाच चोरट्याने त्यांच्या गळ्यावर चाकूने वार केला. यात गंभीर जखमी झाल्याने तो विव्हळतच खाली कोसळला. पतीच्या आवाजाने पत्नी मोनी हीदेखील जागी झाली. तिने आरडाओरडा करूनये, म्हणून तिच्याही हातावर वार करून तिथून पलायन केले. याप्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. काशिमीरा पोलिसांसमवेत स्थानिक गुन्हे शाखेकडूनही या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता. घटनास्थळावरून पोलिसांनी चाकू जप्त केला होता. गंभीर जखमी झालेल्या अन्सारी दाम्पत्याला आधी स्थानिक, नंतर उत्तर प्रदेशात उपचारासाठी नेण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती सुधारली आहे. या घटनेनंतर दुसºयाच दिवशी असाच प्रकार त्याच परिसरात घडला. झोपडपट्ट्यांमधून गर्दुल्ले तसेच मद्यपी मोबाइल चोरून त्यांची अल्प दरांमध्ये विक्री करत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांना मिळाली होती. तिच्या आधारे उपनिरीक्षक अभिजित टेलर यांच्या पथकाने चोरीला गेलेल्या मोबाइलचा शोध घेतला. तेव्हा ते विकणारा मुंबईच्या बेहरामपाड्याचा असल्याचे आढळले. तो २७ सप्टेंबरच्या घटनेनंतर ३० सप्टेंबर रोजी दुबईत मामाकडे पसार झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली बडाख यांच्या पथकाने त्यावर ‘लूक आउट नोटीस’ सहार आंतरराष्टÑीय विमानतळावर बजावली होती. तो दुबईतून भारतात ४ नोव्हेंबर रोजी परतला. त्याचवेळी सहार विमानतळावरील प्रशासनाने ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेला माहिती दिल्यानंतर त्याला तत्काळ ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून चोरीतील आठ मोबाइलही हस्तगत केले आहेत. तर, खुनाच्या प्रयत्नासाठी वापरलेला चाकूही यापूर्वीच पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केला होता. मोबाइलचोरीतून मिळणाºया पैशांमधून तो अमली पदार्थांचे सेवन करत होता, अशी कबुलीही त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.