लाच घेताना ठाणे ग्रामीणचा पोलीस एसीबीच्या जाळ्यात
By अजित मांडके | Published: March 2, 2023 08:27 PM2023-03-02T20:27:31+5:302023-03-02T20:28:17+5:30
अटकेतील हवालदार फर्डे याने एका दाखल गुन्ह्यात तिघांकडून अटक न करण्यासाठी प्रत्येकी ८ हजारांची मागणी केली.
ठाणे : दाखल असलेल्या गुन्ह्यात तिघांना अटक न करण्यासाठी प्रत्येकी ८ हजारप्रमाणे २४ हजारांच्या लाचेची मागणी करत, १८ हजार रुपये स्वीकारताना ठाणे ग्रामीण पोलीस दलातील कल्याण तालुका पोलीस ठाण्याचा पोलीस हवालदार धंनजय लक्ष्मण फर्डे (४८) हा ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली असून याप्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अटकेतील हवालदार फर्डे याने एका दाखल गुन्ह्यात तिघांकडून अटक न करण्यासाठी प्रत्येकी ८ हजारांची मागणी केली. तडजोडीअंती प्रत्येकी ६ हजार रुपये देण्याचे ठरले. याचदरम्यान त्यांनी ठाणे एसीबीत याबाबत तक्रार केली होती. त्यानुसार गुरुवारी दुपारी ठाणे एसीबीने सापळा रचुन हवालदार फर्डे याला १८ हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी गुन्हा दाखल करत, पोलीस हवालदार फर्डे याला अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक पल्लवी ढगे पाटील करत आहेत.