ठाण्यात एकाच दिवशी, एकाच वेळी पाच हजार विद्यार्थ्यांचे घुमणार वंदेमातरमचे सूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 03:40 PM2017-12-07T15:40:13+5:302017-12-07T15:51:15+5:30
ठाण्यात एकाच दिवशी, एकाच वेळी पाच हजार विद्यार्थ्यांचे वंदेमातरमचे सूर घुमणार आहे. यानिमित्ताने विद्यार्थ्यांचा आपापल्या शाळांत, महाविद्यालयांत सराव सुरू आहे.
ठाणे: भगिनी निवेदिता उत्कर्ष मंडळाने भगिनी निवेदिता यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘सामहिक संपूर्ण वंदेमातरम’ गायनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. गुरूवार १४ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते ११ यावेळेत मॉडेला कंपाऊंड, मुलुंड चेकनाक्याच्या जवळ, ठाणे येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमात ठाणे शहरातील पाच हजार विद्यार्थी सहभागी होणार आहे. शाळांबरोबर महाविद्यालयांनी देखील यात सहभाग घेतला आहे. सरस्वती सेकंडरी स्कूल, डॉ. बेडेकर विद्यामंदिर, महाराष्ट्र विद्यालय, मो.ह. विद्यालय, ब्राह्ण विद्यालय, शिवसमर्थ विद्यालय, सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल, ज्ञानप्रसारणी विद्यालय, मनिषा विद्यालय, आर.जे. ठाकूर, श्रीराम विद्यालय, अनमोल, नानिक, पीपल्स एज्युकेशन, नाखवा, आनंद विश्वर गुरुकुल शाळा व महाविद्यालय, ज्ञानसाधना महाविद्यालय, जोशी बेडेकर महाविद्यालय अशा एकूण जवळपास २५ शाळा व महाविद्यालयांचा यात समावेश आहे. भगिनी निवेदिता या परदेशी स्त्री, स्वामी विवेकानंदांची शिष्या बनून जेव्हा भारतीय स्त्रीयांसाठी काम करायला आल्या, तेव्हा त्या वेळच्या प्रतिकूल परिस्थीतीमध्ये सुद्धा भारतीय स्त्री, भारतीय शिक्षण यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत, वंदे मातरमचा उच्चार आग्रहपुर्वक व्हावा यासाठी उचललेले आतोनात कष्ट हे आजच्या तरुणपिढीसमोर यावे यासाठी भगिनी निवेदिता उत्कर्ष मंडळाने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संपूर्ण वंदे मातरम शिकवून देशप्रेमाची भावना जागृत करण्यासाठी येत्या गुरूवारी हा कार्यक्रम आयोजित केला आहे असे मंडळाच्या डॉ. अश्विनी बापट यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी मंडळाच्या बापट यांच्यासह श्वेता गांगल, रोहिणी बापट, सुनंदा अमरावतकर, सुधा शिदये, मनिषा जोशी, प्रिया ढवळे या मेहनत घेत आहेत. विद्यार्थ्यांचा सराव त्यांच्या शाळांमध्येच सुरू आहे असे डॉ. बापट म्हणाल्या. विद्यार्थ्यांना कार्यक्रमस्थळी ने - आण करण्यासाठी मंडळाने बसव्यवस्था देखील केल्याचे सांगण्यात आले.