बिल्डरहितासाठी जि.प.ची कन्याशाळा बंद करण्याचा डाव, बी.जे. हायस्कूलचा ठाणे मनपात समायोजनेचा कट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 03:12 AM2018-09-25T03:12:24+5:302018-09-25T03:12:37+5:30
- सुरेश लोखंडे
ठाणे : येथील जिल्हा परिषदेच्या ब्रिटिशकालीन बी.जे. हायस्कूल आणि कन्याशाळा या दोन्ही हायस्कूलमध्ये सुमारे ७० इतक्या अत्यल्प उपस्थितीमुळे या दोन्ही शाळा एकत्र करून एक हायस्कूल सुरू ठेवायची की, त्यांना ठाणे महापालिकेच्या शाळेत समाविष्ट करून घ्यायचे, यासाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत. ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात या दोन्ही शाळा असून त्यांच्या जमिनीला आज कोट्यवधींची किंमत आहे. या कोट्यवधींच्या जमिनीवर डोळा ठेवून खासगीकरणाचा आधार घेऊन ही जमीन बिल्डरच्या घशात घालण्याचा काही राज्यकर्ते आणि अधिकाऱ्यांचा डाव असून त्यासाठीच अत्यल्प पटसंख्येच्या नावाखाली कन्याशाळा बंद करून त्यातील विद्यार्थ्यांचे महापालिका शाळेत समायोजन करण्याचे घाटत असल्याचे सांगण्यात येत आहे.
सध्या बी.जे. हायस्कूलच्या नव्या इमारतीचे काम सुरू असून ती काही वर्षांपासून कन्याशाळेच्या वास्तूत भरते. सकाळी भरणाºया या बी.जे. हायस्कूलच्या पटावर ६३ विद्यार्थी आहेत. पण, प्रत्यक्षात सुमारे ४० ते ४२ विद्यार्थ्यांची उपस्थिती आढळते. याच वास्तूत कन्याशाळा दुपारच्या सत्रात भरते. तिच्या पटावर ६६ विद्यार्थिनी आहेत. मात्र, केवळ ३० ते ३८ विद्यार्थिनींची वर्गात रोजची उपस्थिती असते. ठाणे जिल्हा परिषदेच्या या दोन्ही हायस्कूलमध्ये पाचवी ते दहावीचे वर्ग आहेत. पण, दोन्ही शाळांची विद्यार्थी संख्या सुमारे ७० च्या जवळपास आहे. या दोन्ही शाळांत अल्प विद्यार्थी संख्या आहे. यामुळे कन्याशाळा बी.जे. हायस्कूलमध्ये समाविष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यानंतर, हे बी.जे. हायस्कूल बांधलेल्या नवीन इमारतीत सुरू करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
या हालचालींसंदर्भात माध्यमिक शिक्षणाधिकारी शेषराव बढे यांना विचारणा केली असता, त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला. कमी विद्यार्थी संख्येच्या शाळा बंद करण्याचा शासनाचा तसा जीआर आहे. त्यास अनुसरून या शाळांचे एकत्रीकरण करण्याचे काम सुरू आहे. जूनपर्यंत ते पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे बढे म्हणाले. कन्याशाळेची इमारतही ब्रिटिशकालीन असल्यामुळे ती आता धोकादायक झाली. या शाळेचा वरचा मजला आधीच पाडून इमारतीचा भार कमी केला आहे. धोकादायक नसलेल्या वर्गखोल्यांत दोन्ही हायस्कूल दोन सत्रांत वास्तूमध्ये सुरू आहे.
जि.प.ला शहरातील शाळा डिजिटल करता आल्या नाहीत
इमारत जीर्ण झाल्यामुळे कन्याशाळेची वास्तू पाडण्याचाही प्रयत्न सुरू आहे. यानंतर, त्यावर काय बांधणार, यावर मात्र प्रशासनाकडून काहीच सांगितले जात नाही. ग्रामीण भागातील एक हजार ३६३ शाळा डिजिटल केल्याचा दावा करणाºया जिल्हा परिषदेचे मात्र शहरातील या दोन हायस्कूलकडे दुर्लक्ष झाले.
यामुळे येथील विद्यार्थी संख्या रोडावली. शहरातील अन्य शाळांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. ग्रामीणमधील १० शाळा विद्यार्थी संख्येअभावी बंदही कराव्या लागल्या.
मात्र, ही नामुश्की पचवण्यासाठी जिल्ह्यातील सुमारे ९५० शाळा प्रगत केल्याचा दावा आहे. परंतु, जिल्हा परिषद इमारतीला लागून असलेल्या कन्याशाळा प्रगतही करता आली नाही आणि विद्यार्थी संख्याही जिल्हा परिषदेला वाढवता आलेली नाही.
कन्याशाळेच्या केवळ भूखंडाच्या श्रीखंडावर लक्ष
ब्रिटिशकालीन असलेल्या या कन्याशाळेचा शैक्षणिक दर्जा वाढवण्याची गरज होती व आहे. पण, केवळ महिला व मुलींचे सबलीकरण करण्याच्या घोषणा करणाºया प्रशासनाला गरीब, दीनदलितांच्या मुलींच्या कन्याशाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारता आला नाही. भले मोठे प्रांगण असलेल्या या शाळेला सुसज्ज करता आले नाहे.
‘बेटी पढाव और बेटी बचाव’ असे शासनाचे उपक्रम राबवणारी जिल्हा परिषद शहरातील या कन्याशाळेलाडिजिटल करू शकली नाही. शहराच्या अतिमहत्त्वाच्या ठिकाणच्या या शाळेच्या भूखंडावर लक्ष केंद्रित करून आगामी सहा महिन्यांत ही कन्याशाळा तोडण्याचे प्रयत्न आहेत.
यामुळे शहरातील हक्काच्या शाळेपासून या सावित्रीच्या लेकी वंचित होतील. त्यांना हक्काचे शिक्षण महागड्या शाळेत घेणे शक्य होणार नसल्याने त्यांच्या पालकांसमोर नवे संकट उभे राहणार आहे.