ठाणे सत्र न्यायालयाने फिर्यादीलाच ठोठावला दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 09:20 IST2025-04-06T09:20:14+5:302025-04-06T09:20:29+5:30
न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याप्रकरणी शुक्रवारी हा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती सरकारी वकील संजय मोरे यांनी दिली.

ठाणे सत्र न्यायालयाने फिर्यादीलाच ठोठावला दंड
ठाणे : काशिमीरा पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या खंडणी आणि मारहाणीच्या गुन्ह्यात फिर्यादी यांना ठाणे सत्र न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठोठावला आहे. पोलिस यंत्रणा आणि न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याप्रकरणी शुक्रवारी हा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती सरकारी वकील संजय मोरे यांनी दिली.
फिर्यादी देवकुमार शेट्टी हे मीरा रोड, महाजनवाडी येथील ए बॉसी बारचे मॅनेजर आहेत. १३ मार्च रोजी आरोपी उजाला चौधरी यांनी ते दीपक पांडे याचा माणूस असून बार सुरू ठेवायचा असेल, तर दरमहा २५ हजार हप्ता द्यावा लागेल, असे शेट्टी यांना सांगितले. त्याला शेट्टी यांनी नकार दिल्यावर चौधरी यांनी मारहाण करून चाकूचा धाक दाखवला. तसेच खंडणी न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी काशिमीरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर चौधरी याने ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. त्या अर्जाची सुनावणी न्यायाधीश अमित शेटे यांच्यासमोर आल्यावर शेट्टी यांनी चौधरी यांना जामीन देण्यास काही हरकत नाही, असे प्रतिज्ञापत्र सादर केले. त्याला सरकारी वकील संजय मोरे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. तो आक्षेप न्यायालयाने ग्राह्य धरला.
एक आठवड्यात रक्कम जमा करा
न्यायालयाने चौधरी याला जामीन मंजूर करताना, पोलिस यंत्रणा आणि न्यायालयाचा वेळ वाया घालवला म्हणून शेट्टी यांना २५ हजार रुपये दंड ठोठावला. दंडाची रक्कम एक आठवड्यात सरकारी दप्तरी जमा करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत, अशी माहिती सरकारी वकील मोरे यांनी दिली.