ठाण्यात साकारणार राज्यातील दुसरे माॅडेल करिअर सेंटर; केंद्र सरकारची मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 03:23 AM2020-12-21T03:23:06+5:302020-12-21T06:59:24+5:30
Thane : सध्याच्या कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे रूपांतर या मॉडेल करिअर सेंटरमध्ये करण्यात येणार आहे. यासाठी ४१ लाख ३२ हजार रुपये निधीही केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात मंजूर केला आहे.
- नारायण जाधव
ठाणे : देशातील युवकांच्या भविष्यातील प्रगतीच्या दृष्टीने त्यांना उत्तम कौशल्य प्राप्त करता यावीत, राेजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी केंद्रीय श्रम व रोजगार मंत्रालयाने राष्ट्रीय करिअर सेवा योजना मंजूर केली आहे. याअंतर्गत प्रत्येक राज्यात एक मॉडेल करिअर सेंटर स्थापन करण्याचे आदेश असून त्यानुसार महाराष्ट्रात यवतमाळ येथे जानेवारी २०१६ मध्ये असे एक सेंटर स्थापन केले आहे. आता सर्वाधिक नागरीकरण आणि औद्योगिकीकरण झालेल्या ठाणे जिल्ह्यातही राज्यातील दुसरे मॉडेल करिअर सेंटर स्थापन करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.
सध्याच्या कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे रूपांतर या मॉडेल करिअर सेंटरमध्ये करण्यात येणार आहे. यासाठी ४१ लाख ३२ हजार रुपये निधीही केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात मंजूर केला आहे. ग्रामीण, स्थानिक, निमशहरी भागातील रोजगार इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधी, तंत्रज्ञानाचा वापर करून समुपदेशन करून प्रशिक्षण देणे हा या सेंटरचा उद्देश आहे.
रोजगार आणि बाजार क्षेत्राचा अभ्यास करून रोजगार संधीचे अंदाज वर्तविणे, उमेदवारांचे त्यांचे कौशल्य, स्वारस्य आणि मागणीचा विचार करून समुपदेशन करणे, मागणीनुसार रोजगारक्षम व कौशल्ययुक्त मनुष्यबळाची सांगड घालणे, केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या विविध सेवासुविधांचा प्रचार व प्रसिद्धी देणे आदी सेवा करिअर सेंटरमार्फत देण्यात येणार आहेत.
केंद्र व राज्य शासनाचा सहभाग
करिअर सेंटर स्थापण्याकरिता समुपदेशकांची विविध प्रशिक्षणाद्वारे क्षमता बांधणी करणे, उमेदवारांना समुपदेशन व प्रशिक्षण देण्यासाठी अधिकाऱ्यांना मूल्यमापन किटसह हिंदी व स्थानिक भाषेत साहित्य पुरविणे, वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे निरसन करणे, अभिक्षमता चाचण्या घेणे, स्थानिक स्तरावर रोजगार मेळावे आयोजित करून उद्योजकांची सूची तयार करणे, तज्ज्ञांची मदत घेऊन अहवाल तयार करणे, वेबपोर्टल सुरू करणे, केंद्र शासनाच्या विविध रोजगाराभिमुख योजनांची माहिती पुरविणे, कॉल सेंटर सुरू करणे ही कामे केंद्र शासनाने करावयाची आहेत. तर राज्य शासनाने करिअर सेंटर आवश्यक निधी देणे, देखरेखीसाठी कौशल्य विकास विभागाच्या उपयुक्तांची नियुक्ती करून मनुष्यबळ पुरविण्याची जबाबदारी सोपविली आहे