ठाणे : दिवाळी पहाट वरुन शिंदे आणि ठाकरे गट आमने सामने, कोणाला मिळणार जागा?

By अजित मांडके | Published: October 14, 2022 03:04 PM2022-10-14T15:04:24+5:302022-10-14T15:06:21+5:30

आता दिवाळी पहाट कोणाची साजरी होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Thane Shinde and Thackeray group faction face to face from Diwali pahat who will get place | ठाणे : दिवाळी पहाट वरुन शिंदे आणि ठाकरे गट आमने सामने, कोणाला मिळणार जागा?

ठाणे : दिवाळी पहाट वरुन शिंदे आणि ठाकरे गट आमने सामने, कोणाला मिळणार जागा?

Next

ठाणे : दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवतिर्थावरुन शिंदे आणि ठाकरे गटात चांगलेच घमासान झाले होते. त्यानंतर आता ठाण्यातही दिवाळी पहाटच्या निमित्ताने बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आमने सामने आल्याचे दिसत आहे. मागील १० वर्षे डॉ. मुस रोडवर ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्याकडून दिवाळी पहाटचा कार्यक्रम आयोजित केला जातो. परंतु आता त्याच ठिकाणी शिंदे गटाकडूनही दिवाळी पहाटसाठी महापालिका आणि पोलिसांकडे अर्ज करण्यात आला आहे. त्यामुळे आता दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे निमित्ताने दोन्ही गट पुन्हा आमने सामने आल्याचे चित्र आहे.

ठाण्यात खासदार राजन विचारे यांच्या संस्थेच्या माध्यमातून डॉ. मुस रोड, राजावत ज्वेलर्सच्या ठिकाणी मागील १० वर्षे दिवाळी पहाटचा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. परंतु आता शिवसेनेत दोन गट पडल्याने यंदा त्याचे पडसाद दिवाळी पहाटच्या कार्यक्रमावर देखील पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मुंबईत दसरा मेळाव्यासाठी ज्या पद्धतीने दोनही गटाकडून शिवतिर्थावर दावा केला होता. त्यानंतर आता ठाण्यात दिवाळी पहाटच्या कार्यक्रम स्थळासाठी दोनही गटाकडून दावा करण्यात आला आहे. आम्ही आधी परवानगी मागितल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. तर आम्ही प्रथम महापालिका आणि पोलिसांना पत्र दिले असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आता दिवाळी पहाट कोणाची साजरी होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मागील १० वर्षे युवा सेनेचे पदाधिकारी नितीन लांडगे यांच्या माध्यमातून युवा सेनेकडून पत्र दिले जात असून त्यांच्या पत्रवरच परवानगी दिली जात असल्याचे मत शिंदे गटाने व्यक्त केले आहे. परंतु आता नितीन लांडगे हे शिंदे गटात सामील झाले असल्याने त्यांनी यंदा देखील त्यांच्या युवासेनेच्या पत्रवर १९ सप्टेंबर रोजी पालिका आणि पोलिसांकडे परवानगी मागितली असून त्यांना ती देण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. शिवाय चिंतामणी चौकातही शिंदे गटाकडून जागा मागितली आहे.

तर दुसरीकडे मागील १० वर्षे आमच्या संस्थेच्या माध्यमातून त्याठिकाणी दिवाळी पहाट साजरी केली जात असल्याने आम्ही परवानगी मागितली होती. त्यानुसार पालिकेने आम्हाला देखील त्याच ठिकाणी परवानगी दिली असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी केला आहे. शिंदे गटाकडून पत्र आता देण्यात आले असून मागची तारीख पत्रवर टाकण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे. पालिका देखील चुकीच्या पध्दतीने कामकाज करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान ठाकरे गटाने डॉ. मुस रोडसाठी परवानगी मागितलीच नसल्याचा दावा शिंदे गटाने केला असून गडकरी रंगायतन येथे परवानगी मागितली असल्याचे बोलले जात आहे. मात्र मागील १०वर्षे आम्ही ज्याठिकाणी दिवाळी पहाट साजरी करीत आहोत, यंदाही त्याच ठिकाणी साजरी केली जाणार असल्याचे ठाकरे गटाकडून स्पष्ट करण्यात आले.

मागील १० वर्षे आमच्या संस्थेच्या माध्यमातून डॉ. मुस रोडवर दिवाळी पहाट साजरी केली जात आहे. शिंदे गटाकडून आता त्याच ठिकाणची परवानगी मागितली आहे. आम्हाला पालिका, अग्निशमन दल, पोलिसांनी परवानगी दिली आहे. एकीकडे सण जल्लोषात साजरे करा असे सांगितले जात आहे. मात्र त्याच सणांना गालबोट लावण्याचे आणि सण साजरे करु नये यासाठी त्यांच्याकडून काम सुरु आहे.
राजन विचारे
खासदार, ठाणे, शहर

युवा सेनेच्या माध्यमातून मागील वर्षी मी पत्र व्यवहार करीत आलो असून त्याच माध्यमातून यंदा देखील एक महिना आधीच परवानगी मागितली आहे. त्यानुसार नियमानुसार पालिकेने, पोलिसांनी परवानगी दिलेली आहे. आम्ही कुठेही आता पत्र देऊन आधीची तारीख टाकलेली नाही, चुकीचे आरोप केले जात आहेत.
नितिन लांडगे,
विस्तारक, युवासेना

Web Title: Thane Shinde and Thackeray group faction face to face from Diwali pahat who will get place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.