ठाण्यात शिवसेना, राष्ट्रवादीत श्रेयवादावरून जुंपली; जितेंद्र आव्हाडांनी थेट पुलावर गाडी नेली, नेमकं काय घडलं वाचा..

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 04:00 PM2022-01-15T16:00:42+5:302022-01-15T16:02:06+5:30

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला खारेगाव येथील रेल्वे क्रॉसिंगवर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा आज पार पडत आहे. पण यावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचं चित्र दिसून आलं आहे.

Thane Shiv Sena and NCP clashed over kharegaon bridge opening Jitendra Awhad took the car directly on the bridge | ठाण्यात शिवसेना, राष्ट्रवादीत श्रेयवादावरून जुंपली; जितेंद्र आव्हाडांनी थेट पुलावर गाडी नेली, नेमकं काय घडलं वाचा..

ठाण्यात शिवसेना, राष्ट्रवादीत श्रेयवादावरून जुंपली; जितेंद्र आव्हाडांनी थेट पुलावर गाडी नेली, नेमकं काय घडलं वाचा..

Next

ठाणे-

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला खारेगाव येथील रेल्वे क्रॉसिंगवर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा आज पार पडत आहे. पण यावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचं चित्र दिसून आलं आहे. रेल्वे फाटकामुळे खारेगाव येथे वाहतुकीच्या त्रासाला गेली अनेक वर्ष नागरिकांना सामोरं जावं लागत होतं. आता रेल्व क्रॉसिंग टाळून रहिवाशांना थेट उड्डाणपुलावरुन प्रवास करता येणार आहे. पण या कामात श्रेयवादाची लढाई सुरू झाली होती. 

उड्डाणपुलाचं लोकार्पण होण्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले होते. शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुलाचा लोकार्पण सोहळा आज होत आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठपुराव्यामुळे काम पूर्णत्वास गेलं असा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते पुलाचं लोकार्पण व्हावं अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती. आज कार्यक्रम स्थळी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची गर्दी झाली. यावेळी कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद आव्हाड उपस्थित राहणार होते. त्यामुळे राष्ट्रवादीकडून 'जितेंद्र आव्हाड तुम आगे बढो'च्या घोषणा दिल्या जात होत्या. तर शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरू होती.

जितेंद्र आव्हाड गाडी घेऊन थेट पुलावर...
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पुलाचं लोकर्पण होण्याआधीच उड्डाणपुलावर गेले होते. त्यामुळे जितेंद्र आव्हाड कार्यक्रमस्थळी येताच ते थेट आपली गाडी घेऊन उड्डाणपुलावरच गेले आणि सर्व कार्यकर्त्यांना घेऊन ते स्वत: पायी चालत कार्यक्रमस्थळी आले. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये यावेळी जोरदार घोषणाबाजीचं वातावरण निर्माण झालं होतं. अखेर जितेंद्र आव्हाड यांनी चतुराईनं 'जितेंद्र आव्हाड आगे बढो'ऐवजी महाविकास आघाडीची घोषणा देण्याचं आवाहन केलं आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणेत बदल करुन 'महाविकास आघाडीचा विजय असो' अशी घोषणा देण्यास सुरुवात केली. 

भर कार्यक्रमात टोलेबाजी अन् कोपरखळ्या...
श्रेयवादाच्या लढाईमुळे कार्यक्रमाला उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये आधीच जुंपलेली असताना नेत्यांनीही आपल्या भाषणात कोपरखळ्या आणि टोलेबाजी करत वातावरण चांगलंच गरम केल्याचं यावेळी पाहायला मिळालं. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन करताना कोविड नियमांची आठवण उपस्थितांना करुन दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी देखील पालन करावे, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केले.

२००० सालापासूनच खारेगाव उड्डाणपुलासाठी शिवसेनेच्या नगरसेवकाकडून पहिला प्रस्ताव देण्यात आला होता असं सांगत राष्ट्रवादीच्या श्रेयवादाची हवाच शिवसेनेचे महापौर नरेश म्हस्के यांनी काढली. तर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या मतदार संघाला २ हजार कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला अशी कोपरखळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मारली. मग जितेंद्र आव्हाड यांनीही आपल्या रोखठोक शैलीत फटकेबाजी केली. "२००९ साली मी आमदार झालो. मात्र, विकास कामांसाठी कधीही निधी मागण्याची आवश्यकता भासली नाही. २००९ नंतर कळवा आणि मुंब्रा यांच्यात झालेले विकास कामे यातून फरक दिसून येईल. भास्कर नगर मधील रस्त्यासाठी विधानसभेत मांडल्यानंतर नगरविकास मंत्री भास्कर जाधव यांनी त्या रस्त्याला स्थगिती देत येणार नसल्याचे सांगितले. २० वर्षानंतर हा रस्ता झाला. महापौरांनी मिशन कळवा, असे संबोधले मात्र, त्यांचे मिशन कळवा काय हे समजलं नाही. जयवंत पाटील यांच्या हस्ते उदघाटन करतील अशी सूचना केल्यानंतर हालचाली सुरू झाल्या होत्या. महापौर नरेश म्हस्के तुम्ही चाणक्य आहात, नारदमुनी होऊ नका", असा टोला आव्हाड यांनी लगावला.

एकनाथ शिंदेंनी चतुराईनं वातावरण निवळतं केलं...
"उड्डाण पुलाच्या कामात जितेंद्र आव्हाड यांची भूमिका मोलाची. मात्र हा प्रकल्प होताना आलेल्या अडचणींचा व ते किती गरजेचे आहे, त्याचे गांभीर्य काय याबाबत रेल्वे प्रशासनाकडे श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा केला. शिंदे आणि आव्हाड आमच्यात दोघांमध्ये दोस्ती आहे. आम्ही कधी एकमेकांविषयी मनात द्वेष ठेवत नाही. ते निवडणुकांच्या काळात ते त्यांच्या पक्षाची भूमिका आणि मी माझ्या पक्षाची भूमिका बजावत असतो. माझ्या मतदार संघातील विकास कमांचे आकडे आणि तुमच्या मतरदार संघातील काम बघा. शरद पवार हे देशाचे नेते आहेत, त्यामुळे त्यांचे नाव स्टेडीयमला देण्यासाठी लगेच सहमती दर्शवली. धोकादायक इमारतींचा प्रश्न सोडविण्यासाठी क्लस्टर योजना राबविण्यासाठी एकमताने लढा दिला", असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसंच मिशन कळवा नंतर तुम्ही लगेच मिशन वागळे याचा उल्लेख केला. त्यानंतर शिंदे यांनी तुम्ही देखील मिशन वागळे राबवा मी तुम्हाला रोखणार नाही. मात्र, दोन्ही पक्षातील नेत्यांनी चिंता करू नये महाविकास आघाडी होणार आहे. आम्ही कधी कमिशनचा विचार न केला लोकांचे काम केले, असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

 

Web Title: Thane Shiv Sena and NCP clashed over kharegaon bridge opening Jitendra Awhad took the car directly on the bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.