ठाण्यात संपत्तीच्या वादातून शिवसेना नगरसेवकाच्या मुलाचा सावत्र भावाने केला खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 08:21 PM2020-09-24T20:21:06+5:302020-09-24T20:29:34+5:30
ठाण्यातील शिवसेना नगरसेवक माणिक पाटील यांच्या मुलाची त्याचा सावत्र भाऊ सचिन सर्जेराव पाटील (२६, रा. माणिक पाटील बंगलो, घोडबंदर रोड, ठाणे) याने साथीदाराच्या मदतीने गोळी झाडून हत्या केल्याची घटना रविवारी घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: संपत्तीच्या वादातून ठाण्यातील शिवसेना नगरसेवक माणिक पाटील यांचा मुलगा राकेश (३४) याची त्याचा सावत्र भाऊ सचिन सर्जेराव पाटील (२६) याने गोळी झाडून हत्या केल्याची घटना रविवारी घडली. याप्रकरणी कासारवडवली पोलिसांनी गौरव सिंह (२७) या सचिनच्या साथीदाराला अटक केल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला.
नगरसेवक माणिक बाबू पाटील आणि त्यांची तिसरी पत्नी हे उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल होते. २० सप्टेंबर रोजी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यावेळी त्यांच्या घरातील तिजोरी फोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्याचवेळी त्यांचा मुलगा राकेश माणिक पाटील (३४, रा. साईसृष्टी बिल्डींग, वाघबीळ, ठाणे) हाही बेपत्ता असल्याचे आढळले. आपल्याच घरात राकेशने चोरी केल्याचा सुरुवातीला संशय व्यक्त होत होता. तो बेपत्ता असल्याची तक्रार माणिक पाटील यांनी २० सप्टेंबर रोजी कासारवडवली पोलीस ठाण्यात दाखल केली होती. याच प्रकरणाच्या चौकशीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सागर जाधव यांच्या पथकाने २३ सप्टेंबर रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास माणिक पाटील यांचा चालक तसेच सावत्र मुलगा सचिन सर्जेराव पाटील याचा साथीदार गौरव सिंह याला त्याच्या आझादनगर येथील घरातून ताब्यात घेतले. त्याचवेळी त्याने या खूनाची कबूली दिली. माणिक पाटील यांच्या राहत्या बंगल्याच्या वाटणीवरुन तसेच मालमत्तेतील वादातून सचिन पाटील आणि गौरव सिंह यांनी आपसात संगनमताने राकेशच्या खूनाचा कट रचला. सचिन याने राकेशवर २० सप्टेंबर रोजी सकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास पिस्टलने गोळी झाडली. यात त्याचा खून झाल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी राकेशचा मृतदेह वाशी खाडीच्या पूलावरुन पाण्यात फेकून दिल्याची कबूली गौरवने पोलिसांना दिली. गौरवला या खून प्रकरणात अटक करण्यात आली असून मुख्य सूत्रधार सचिन पाटील याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणी खून आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी सचिन आणि गौरव या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
------------------------
खूनाबरोबर साडे तीन किलोच्या सोन्याचीही चोरी
माणिक पाटील यांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार आधी केल्यानंतर २२ सप्टेंबर रोजी घरातून सुमारे साडे तीन किलोचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचीही तक्रार कासारवडवली पोलीस ठाण्यात नोंदविली. त्याचवेळी राकेशची मोटारसायकलही चोरीस गेल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, ही मोटारसायकल माणिक पाटील यांचा चालक गौरव सिंह याच्याकडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने या सर्व प्रकाराची कबूली दिली. त्याच्याकडून मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. खूनासाठी वापरलेले पिस्टल आणि राकेशचा मृतदेह अद्यापही हाती लागला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
यातील मुख्य आरोपी सचिन सर्जेराव पाटील हा माणिक पाटील यांच्या तिसऱ्या पत्नीच्या पहिल्या पतीचा मुलगा आहे. तर ज्याचा खून झाला आहे तो माणिक यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा आहे.